मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. भाजपच्या यादीनंतर शिवसेनेही लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 23 जागांपैकी शिवसेनेने 21 लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तर सातारा आणि पालघर या जागेबाबत निर्णय नंतर घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेची मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
आमदार हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून तर ओमराजे निंबाळकर यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. हिंगोलीमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून सुभाष वानखेडे यांनी निवडणूक लढवली होती. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजीव सातव यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा केवळ १६३२ मतांनी पराभव केला होता. मात्र काही वर्षांपूर्वी सुभाष वानखेडे यांनी शिवसेना पक्ष सोडून भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे या जागेवर नांदेड दक्षिणमधील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे.
नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. हेमंत पाटील यांनी नांदेडच्या तरोडा नाका शाखेचे शाखाप्रमुख ते आमदार असा राजकीय प्रवास केला आहे. हिंगोली मतदारसंघात माझा जन्म झाला असून माझं बालपणं हिंगोली मतदारसंघात गेलंय त्यामुळे हिंगोली लोकसभेच्या मतदारसंघाची आग्रही होतो अशी माहिती हेमंत पाटील यांनी दिली. वसमत ते कन्हेरगाव पुल आणि सेनगाव ते किनवट असा प्रचंड भौगोलिक विस्तार हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आहे. स्वर्गीय उत्तमराव राठोड यांचा अपवाद वगळता हिंगोलीतून कुणीही परत निवडून आलेलं नाही. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन जागा निवडून आल्या होत्या त्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राजीव सातव यांना विजय मिळवला होता.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करत शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना संधी दिलेली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबर्सना चप्पल मारहाणप्रकरणी चर्चेत आले होते.या प्रकरणामुळे शिवसेनेची नाचक्की झाली होती, स्थानिक शिवसैनिकांमध्येही गायकवाड यांच्याविरोधात नाराजी होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांना डच्चू देण्यात आला आहे.
पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांनी 2009 विधानसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिंरजीव राणा जगजीतसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर, २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ओम राजे निंबाळकर यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी विजयश्री खेचून आणला होता. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येपासून या मतदारसंघात निंबाळकर विरुध्द पाटील असा सत्ता संघर्ष नेहमी पाहायला मिळतो.