मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असताना एकमेकांना डिवचण्याची संधी राजकीय नेते सोडत नाही. यातच मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसतानाही मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचण्याचं काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना बारामतीहून स्क्रिप्ट येते अशी टीका केली होती, हा धागा पकडत आशिष शेलारांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटवरुन टार्गेट केले. ट्विटमध्ये शेलार म्हणाले की, “सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले.!!”, एवढचं नाही तर “शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे” असा टोलाही शेलारांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. मोदी आणि शहा या जोडीला राजकीय पटलावरून बाजूला सारा, फायद्या कोणालाही झाला तरी चालेल पण भाजपाला मतदान करु नका असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले. राज यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना थेट टार्गेट केल्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे बारामतीचे पोपट आहे असा उल्लेख केला होता त्यावेळी राज यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला होता.
आशिष शेलार यांच्या ट्विटला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत उत्तर दिलंय. “काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रिपद दिलं जायना, शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले, प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातलेच कवी आठवले” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आशिष शेलारांना चिमटा काढला आहे. मतदानाची तारीख जवळ येईल तसं निवडणुकीच्या प्रचाराला आणखी रंगत येणार यात काही शंका नाही.