नवी दिल्ली - सीएसडीएस-लोकनीती आणि दैनिक भास्कर यांनी मतदानापूर्वी केलेल्या निवडणूक सर्व्हेमध्ये भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत 50 ते 70 जागांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे तर काँग्रेसला 20-30 जागांचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जातंय. एनडीएच्या मतदानाच्या टक्केवारीत 4 टक्क्यांनी घट होईल तर युपीएच्या मतदानाच्या टक्केवारीत 3 टक्क्यांनी वाढ होईल.
44 टक्के शेतकरी वर्ग एनडीएसोबत तर 32 टक्के युपीएसोबत असल्याचं दिसून आले आहे. सर्व्हेमध्ये दक्षिण राज्यांमध्ये जवळपास 45 टक्के लोकांना देश चुकीच्या दिशेला वाटचाल करत असल्याचं वाटतंय तर पहिल्यांदा मतदान करण्यासाठी येणाऱ्या नवीन मतदारांची पहिली पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. 45 टक्के नवीन मतदारांनी मोदी यांना पसंती दिली आहे. तर 32 टक्के नवीन मतदारांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली आहे.
उच्च वर्ग मतदारांमध्ये 46 टक्के मतदारांनी एनडीएला, 32 टक्के युपीएला आणि 22 टक्के इतरांना मतदान करण्याची पसंती दिली आहे. तर गरिब मतदारांमध्ये 38 टक्के एनडीएला, 28 टक्के युपीए आणि 34 टक्के अन्य अशाप्रकारे मतदान करण्याची इच्छा दर्शवली आहे. 2014 च्या तुलनेत भाजपा आणि सहकारी पक्षाच्या मतदानामध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. तर विरोधी काँग्रेस आणि सहकारी पक्षांच्या मतांमध्येही वाढ होत आहे. एनडीएला 41 टक्के तर युपीएला 30 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळच्या तुलनेत भाजपा आणि सहकाऱ्यांच्या मतदानात 2.6 टक्के तर काँग्रेस आणि सहकाऱ्यांच्या मतदानात 7 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
कोणाला किती मिळणार जागा?भाजपा - 222 ते 232 जागा काँग्रेस - 74 ते 84 जागा एनडीए मित्र पक्ष - 41 ते 51 जागा युपीए घटक पक्ष - 41-51 जागा
कसं असणार 2019 लोकसभेचं चित्र - युपीए - 115 ते 135 जागाएनडीए - 263 ते 283 जागाइतर - 135 ते 155 जागा
सर्व्हे कसा घेण्यात आला?सर्व्हे 19 राज्यांमध्ये 24 तारखेपासून 31 मार्च या दरम्यान करण्यात आला. त्यात 101 लोकसभा मतदारसंघात 101 विधानसभा क्षेत्रातील 10, 010 लोकांनी सहभाग घेतला. सर्व्हेमध्ये 46 टक्के महिला, 19 टक्के अनुसूचित जाती-जमाती, 13 टक्के मुस्लिम, 2 टक्के ईसाई आणि 3 टक्के शिख मतदारांचा समावेश आहे.