शिवसेना-भाजपा युतीत घटकपक्ष वंचित, रिपाई-रासपला एकही जागा नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:00 PM2019-03-21T17:00:29+5:302019-03-21T17:06:02+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र युतीतील घटक पक्ष अद्याप युतीच्या प्रचारापासून वंचित आहेत.

Lok Sabha Elections 2019 - BJP is not interested to give seats to RSP & RPI | शिवसेना-भाजपा युतीत घटकपक्ष वंचित, रिपाई-रासपला एकही जागा नाही ?

शिवसेना-भाजपा युतीत घटकपक्ष वंचित, रिपाई-रासपला एकही जागा नाही ?

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र युतीतील घटक पक्ष अद्याप युतीच्या प्रचारापासून वंचित आहे. रामदास आठवले यांच्या रिपाईला आणि महादेव जानकर यांच्या रासपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून जागा सोडण्यात येणार नाही अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दक्षिण मुंबईतील जागा रिपाईसाठी सोडावी अशी मागणी केली होती. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ लढवणारे महादेव जानकर यांनीही राष्ट्रीय समाज पक्षासाठी जागा सोडावी अशी मागणी केली आहे. मात्र या दोन्ही पक्षांना एकही लोकसभा मतदारसंघ सोडण्याची मानसिकता भाजपची आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नव्हे तर विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाचा विचार केला जाईल अशी माहिती भाजपच्या एका मंत्र्यांनी दिली. 
काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी शिवसेना-भाजपला जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्या अन्यथा आम्हाला चौथी आघाडी करावी लागेल असा इशारा दिला होता. मात्र सदाभाऊ खोत यांनी चौथ्या आघाडीत येणार नसल्याचे सांगत भाजपसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे महादेव जानकरांनी आता बाहेर चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. याचीही सुरुवात म्हणून पुण्यात मागील आठवड्यात जानकरांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. रासपने भारतीय जनता पार्टीकडे परभणी, माढा किंवा बारामतीपैकी एक जागा द्यावी अशी मागणी केली होती. मात्र जानकरांच्या मागणीला भाजपाने केराची टोपली दाखवली आहे.  

माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. तर बारामती जागेवर महादेव जानकर यांना निवडणूक लढायची असल्यास त्यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढावी असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र महादेव जानकर कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार नाहीत. त्यामुळे बारामती जागेबाबत भाजपाकडून जानकरांना नकार असल्याचं कळतंय. 

मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी महादेव जानकर यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तर सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांच्याविरोधात रामदास आठवले यांनी निवडणूक लढवली होती.  
 

Web Title: Lok Sabha Elections 2019 - BJP is not interested to give seats to RSP & RPI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.