मुंबई - मुस्लीम महिलांसाठी मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेला तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा मसुदा रद्द करणार असल्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आले असून राष्ट्रवादीचे आश्वासन म्हणजे मुस्लीम समाजातील महिलांना पुन्हा अंधाराच्या खाईत ढकलण्याचे कृत्य आहे, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीवर केली तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी याचे उत्तर द्यावं अशी मागणी तावडेंनी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विनोद तावडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा बालिश असून हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्तुतीनामा हा प्रश्नच आहे. दारूण पराभव होणार हे दिसायला लागल्यावर उसनं अवसान ही आणता येत नाही, हेच या जाहीरनाम्यातून दिसून येते. जाहीरनाम्यातील माहिती आणि आश्वासने अतिशय विसंगत स्वरुपाची असून हा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्मचा-याने तयार केला की, राष्ट्रवादीच्या नेत्याने, हा संशोधनाचा विषय आहे. जाहीरनाम्यामध्ये एका ठिकाणी बेरोजगारी कमी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, तर दुसरीकडे रोजगारनिर्मिती कमी झाल्याचे नमूद करण्यात आल्याचं तावडेंनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले २० उमेदवार कसे बसे उभे केले आहेत आणि आता राष्ट्रवादीला देशासमोरील जटील व खडतर प्रश्न सोडविण्याचे स्वप्न पाहत आहेत, असा टोला विनोद तावडे यांनी मारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना दलालांच्या विळख्यातून बाहेर काढले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा शेतकऱ्यांना दलालाच्या विळख्यात ढकलणारा (एमएसपी) किमान आधारमूल्याला लाभांश आणि कमिशन पेमेंट्सच्या यंत्रणा लागू करणार असल्याचा उल्लेख जाहीरनाम्यात करण्यात आले आहे असे निदर्शनास आणून देताना तावडे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात दीनदयाळ उपाध्यय यांच्या विचारसरणीचा स्वीकार केल्याचे दिसून येते. जितके हात तितके काम, तितका विकास या तत्वाचा आम्ही पाठपुरावा करु असे सांगताना दिनदयाळजी यांचे सूत्र राष्ट्रवादीने मान्य केल्याचा आम्हाला आनंद आहे, असा चिमटा तावडेंनी राष्ट्रवादीला काढला.