भाजपाही करणार 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मनसेचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 06:39 PM2019-04-24T18:39:35+5:302019-04-24T18:40:12+5:30
राज यांच्या लाव रे तो व्हिडीओला जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजपाही सज्ज झाली आहे.येणाऱ्या 27 तारखेला भाजपाकडून मनसे स्टाईलने लाव रे तो व्हिडीओ असं सांगत मनसेचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत जोरदार वाढू लागली आहे. महाराष्ट्रात सध्या मनसे आणि भाजपा या दोन्ही पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. भाजपाच्या कामांची पोलखोल करणारे व्हिडीओ दाखवून लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मदत होईल अशा पक्षांना मतदान न करण्याचं आवाहन केलं जातंय. मात्र राज यांच्या लाव रे तो व्हिडीओला जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजपाही सज्ज झाली आहे.
येणाऱ्या 27 तारखेला भाजपाकडून मनसे स्टाईलने लाव रे तो व्हिडीओ असं सांगत मनसेचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. राज ठाकरे यांच्याकडून मांडत असलेल्या मुद्द्यांची वस्तुस्थिती मांडण्यासाठीच भाजपा जाहीर व्यासपीठावर राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याची पोलखोल करणार आहे. हरिसाल डिजिटल गावाचा राज ठाकरे यांनी दाखवलेला व्हिडीओ आणि प्रत्यक्षात त्या गावातून फेसबुकच्या माध्यमातून उपसरपंचाने केलेले लाईव्ह यामुळे भाजपाकडून मनसेची कोंडी करण्याचा इरादा भाजपाने केला आहे. मनसेकडून लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा नाही. असं असतानाही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात भाजपा आणि मनसे यांच्यातील आरोपांची मालिका सुरुच आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज यांच्या मुंबईतील सभेची शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी निवडणुकांनंतरही अशीच चालू राहावी, असे म्हणत त्यांनी राज यांना टोला लगावला. तसेच, राज ठाकरेंनी काळा चौक येथील सभेत दाखवलेल्या कुटुंबाच्या जाहिरातीसंदर्भात बोलताना, शासनाचा किंवा भाजपाचा त्याच्याशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितलं.
मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले होते. राज ठाकरेंनी सभेत बोलवलेल्या कुटुंबाबद्दल बोलतानाही तावडेंनी याचा सरकारशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. कुणीतही मोदीप्रेमाने हे पेज सुरू केलं असून त्याचा सरकारशी आणि भाजपाशी संबंध नाही. तसेच या फोटोवर हे लाभार्थी असे कुठेही लिहिलं नाही. कुणीतरी तो फोटो काढून मोदी हे तो मुमकीन है. असे लिहित त्या कुटुंबाचा फोटो जोडला. अर्थात, त्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय तो फोटो प्रसिद्ध करणे चुकीचे असल्याचेही तावडेंनी म्हटले. तसेच, राज ठाकरेंची ही स्टँडअप कॉमेडी, टुरुंग टॉकीज राज्यातील मतदानानंतरही असंच सुरू राहू द्या, त्यामुळे 23 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होईल, असेही तावडे यांनी म्हटले आहे.
'मोदी है तो मुमकिन है' जाहिरातीची राज ठाकरेंकडून पोलखोल, संपूर्ण कुटुंब मनसेच्या व्यासपीठावर #NarendraModi@mnsadhikrut@RajThackerayhttps://t.co/YIlYvwDjKY
— Lokmat (@MiLOKMAT) April 23, 2019