मुंबई - डॉ. सुजय यांना घरच्यांशी बंड करून भाजप प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आज नाही तर उद्या त्यांच्या घरच्यांनाही पटेल. सुजय यांचा निर्णय योग्य असल्याचं घरच्यांना लक्षात येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. संजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सुजय विखेंचा हा निर्णय काँग्रेससाठी एक धक्का मानला जात असला तरी विखे पाटीलांची नवी पिढी येणाऱ्या निवडणुकीत भाजपासाठी प्रचार करणार असल्याचं स्पष्ट झालं.
अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू होती ती म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील आघाडीतून लोकसभा निवडणूक लढणार की, भाजपचा झेंडा हाती घेत स्वत:च्या घरात बंड पुकारणार. मात्र या सगळ्या चर्चांना मंगळवारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने उत्तर मिळालं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
या पक्ष प्रवेशावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत हा आता कमजोर देश नाही तर मजबूत देश आहे. यामुळे संपूर्ण देशातील तरुणाई भाजपकडे येते आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे याच पिढीचे प्रतिनिधित्व करतात. जे गरीब, दीन-दलित, शोषितांच्या पाठीशी आहेत, त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय सुजय यांनी घेतला आहे. भाजपचा कार्यकर्ता पक्षाचा मालक असतो, या पक्षातून चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होतो. अहमदनगर जिल्हा आता भाजपाचा बालेकिल्ला आहे असं त्यांनी सांगितले तर पक्षात येताना सुजय विखे पाटील यांनी कुठलीही अट ठेवली नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अनेक पक्षांना आता उमेदवार सापडत नाही, 2014 च्या निवडणुकी जेवढ्या जागा जिंकल्या त्याहून अधिक जागा येणाऱ्या 2019 लोकसभा निवडणुकीत जिंकू, महाराष्ट्रात आणि देशात पुन्हा भाजपची सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत नगरची जागा नगरची जागा रेकॉर्ड मतांनी निवडून येणार असल्याचंही सांगितलं.