भाजपाविरोधात 'राज'गर्जना, मनसे घेणार राज्यात 8 ते 9 ठिकाणी सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 12:37 PM2019-04-04T12:37:46+5:302019-04-04T12:39:34+5:30
राज्यभरात 8 ते 9 ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाविरोधात सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे. राज्यभरात 8 ते 9 ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेभाजपाविरोधात सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात येणार आहेत. थेट आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित न राहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचे नियोजन पक्षाकडून करण्यात येत आहे. गुढी पाडवा मेळाव्यामध्ये अधिकृतरित्या याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
या लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे सभा घेण्याची शक्यता
सातारा-उदयनराजे भोसले
सोलापूर - सुशिलकुमार शिंदे
नांदेड - अशोक चव्हाण
ठाणे- आनंद परांजपे
नाशिक - समीर भुजबळ
पिंपरी-चिंचवड- पार्थ पवार
बारामती - सुप्रिया सुळे
उत्तर मुंबई - ऊर्मिला मातोंडकर
ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील
उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त
मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपावर तुफानी टीकास्त्र सोडले होते. 19 मार्चच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्येही राज यांनी लोकसभा लढवणार नसल्याचं सांगत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना राजकीय पटलावरुन बाजूला करा, येत्या निवडणुकीत भाजपाला मतदान करु नका असा प्रचार कार्यकर्त्यांनी करावा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर येणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात आपण बोलू असं सांगितलं होतं.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेकडून शिवाजी पार्कवर गुढी पाडवा मेळावा घेण्यात येणार आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून गुढी पाडवा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पदाधिकारी बैठका, मेळावे घेऊन भाजपाविरोधातील मोहीम मनसे नेत्यांनी सुरु केले आहेत. त्यामुळे गुढी पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.