मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही, मनसेने केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 06:21 PM2019-03-17T18:21:13+5:302019-03-17T18:23:22+5:30
आगामी लोकसभा निवडणूक 2019 ही मनसे लढवणार नाही असं पत्रकं मनसेकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे.
मुंबई - अनेक दिवसांपासून मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत चर्चेला उधाण आलं होतं. नेमकं मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांसह लोकांचेही लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2019 ही मनसे लढवणार नाही असं पत्रकं मनसेकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची "लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९" लढविणार नाही, बाकी १९ मार्च २०१९ ला बोलूच... जय महाराष्ट्र!#LokSabhaElections2019pic.twitter.com/tq8La2y4qt
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 17, 2019
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र मनसेची भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. मनसे निवडणूक लढणार की नाही याबाबत कार्यकर्ते संभ्रमात होते. अखेर या प्रश्नाला मनसेकडूनच उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिकृतरित्या पत्रक काढत आगामी लोकसभा निवडणूक मनसे लढणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 19 मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीबाबत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध केला. मनसेला आघाडीत घेतल्यावर त्याचा फटका उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसला बसू शकतो अशी शक्यता काँग्रेसकडून वर्तवली जात होती. त्यामुळे महाआघाडीत देखील मनसेला स्थान राहिलं नाही.
मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करतील असं सांगण्यात येत होतं. मात्र राज ठाकरेंनी निवडणुकांबाबत आचारसंहिता लागल्यानंतर मनसेची भूमिका स्पष्ट करु असं सांगितलं होतं.
मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मनसे पाठिंबा देणार का हे पाहणे गरजेचे आहे. कारण जर निवडणुकीत मनसे उमेदवार नसतील तर राज ठाकरे नरेंद्र मोदींविरोधात प्रचार कसा करणार हा प्रश्न उपस्थित होता. त्यामुळे राज ठाकरे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचार सभा घेणार का हे पुढील काळात स्पष्ट होईल.