Lok Sabha elections 2019 - आज नरेंद्र मोदींची नांदेडमध्ये तर राज ठाकरेंची मुंबईत सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:54 AM2019-04-06T07:54:36+5:302019-04-06T07:56:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा मुंबईच्या शिवाजी पार्क येथे होणार आहे.
मुंबई - गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत राजकीय पक्षांनीही आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा मुंबईच्या शिवाजी पार्क येथे होणार आहे.
महाराष्ट्रातील मोदींची पहिली सभा वर्ध्यात झाली होती. त्या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. तर 19 मार्च रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसली तरी भाजपाविरोधात प्रचार करण्याचं आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. राज ठाकरे यांनी मोदी-अमित शाह यांच्याविरुद्ध दंड थोपटले असल्याने आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज नेमकं काय बोलणार यावर सगळ्यांचेच लक्ष राहिल.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला दोनच जागा जिंकता आल्या होत्या. त्यामध्ये नांदेड आणि हिंगोलीचा समावेश होता. आता देखील अशोक चव्हाण यांना नांदेडमधून काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये दाखल होणार आहे. नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मोदींच्या सभेमुळे नांदेडमधील लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा झाल्या आहेत. या दोन्ही सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये विकासावर बोलणार की, विरोधकांच्या घराणेशाहीवर याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यात आणि त्यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. देशाला वाचवायचं असेल तर या मोदी-शहा जोडीला राजकीय पटलातून बाजूला सारलं पाहिजे असा प्रहार राज यांनी केला होता. त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्यात राज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेडमधील सभा यामुळे आजच्या दिवशी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघणार आहे.