मुंबई - सातारा लोकसभेतून इच्छुक असलेले उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. नरेंद्र पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र उद्धव ठाकरेंनी नरेंद्र पाटील मातोश्रीवर मला भेटण्यासाठी आले आहेत. या भेटीचे कुठलेही राजकीय अर्थ काढू नका असं सांगत सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र नरेंद्र पाटील सध्या भाजपात आहे आणि सातारा लोकसभा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या रविवारी नरेंद्र पाटील यांच्या संदर्भातील चर्चा मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी मिळून करू, शिवसेना भाजपची युती झाली आहे, नरेंद्र पाटील हे सध्या भाजपमध्ये आहेत त्यामुळे या भेटीचे कुठलेही राजकीय अर्थ काढू नका असं सांगितले.
नरेंद्र पाटील हे सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्ष आहेत. भाजपच्या कोट्यातून त्यांना महामंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. मात्र सातारा लोकसभा मतदारसंघातून ते इच्छुक आहेत तो मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येतो. नरेंद्र पाटील यांनी पूर्वीपासून या मतदारसंघात लढण्याची तयारी केली होती. भाजपाकडून नरेंद्र पाटील उभे राहतील असं चित्र देखील होतं. मात्र ऐन निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपाची युती जाहीर झाल्याने नरेंद्र पाटील यांची गोची झाली. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी नरेंद्र पाटील शिवसेनेच्या दारात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना-भाजप युतीची ताकद आणि माथाडी कामगार नेते अशी ओळख यामुळे नरेंद्र पाटील उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण करू शकतात असं राजकीय विश्लेषकांना वाटते.