मुंबई - भाजपा मतदारांना पैशांचे आमीष दाखवत असल्याच्या बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहेत भाजपातर्फे संपत्तीचे प्रदर्शनही केले जात आहे. नोटाबंदीमुळे कोणाचे भले झाले हे आता दिसू लागले आहे. राम मंदिर बाजूला राहिले, मात्र भाजपाचे टोलेजंग कार्यालय बांधले गेले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ते बोलत होते.
महाआघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसचा रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह होता. त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला आहे. जळगावची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढवेल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आघाडीची सरकार यावं अशी जनतेची भावना आहे त्यामुळे अर्ज भरतानाही लाखो लोकं उपस्थित राहिले. जवान आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचं काम पंतप्रधान करत आहेत. निवडणूक आचारसंहिता भंग केली जातेय. भाजपाच्या मंत्र्यांनी शत्रुराष्ट्राचा सॅटेलाईट पाडला असं विधान केलं, त्याबद्दल त्यांच्या कल्पनाशक्तीचं अभिनंदन करावं तेवढे थोडं आहे असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकात पाटील यांना लगावला
सर्व घटक सरकारवर नाराज आहे, आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मतं खाण्यासाठी महाराष्ट्रात एक आघाडी तयार केली आहे असा आरोप जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता केला. पैशाचं अमिष दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपा करतंय. राम मंदिर झाले नाही मात्र दिल्लीतलं, राज्यातलं भाजपाचे कार्यालय अनेक ठिकाणी थाटले गेले. देशाचा विकास झाला नाही मात्र भाजपाचा विकास झाला हे नक्की असा चिमटा त्यांनी काढला.
तसेच नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची पातळी सोडली आहे. देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने जोरजोरात भाषणं करुन लोकांशी खोटं बोलतात ते पंतप्रधान पदाला न शोभणारे आहे. आक्रस्ताळेपणा करणारा असा पंतप्रधान कधीच देशाने पाहिला नाही असंही जयंत पाटील म्हणाले.