Join us

'उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या मुलाचे लाड कसे करतात ते समोर आलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 6:24 PM

शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना डावलून राजेंद्र गावितांना पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे. 

मुंबई - पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर लगेचच शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना डावलून राजेंद्र गावितांना पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे. 

पालघर लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापून उध्दव ठाकरे इतर मुलांचं पालनपोषण कसं करत आहेत हे समोर आलं आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते  नवाब मलिक यांनी केली आहे. उध्दव ठाकरे हे इतरांच्या मुलांचे पालनपोषण करतो असं बोलत असतील तर श्रीनिवास वनगा यांचं लोकसभेचे तिकीट कापून त्यांचं पालनपोषण कसं करत आहेत हे सिद्ध झाले आहे असं नवाब मलिकांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. मी माझ्या पोरांसोबत इतरांच्या पोरांचेही लाड करतो. इतरांची पोरं नुसती धुणीभांडी करण्यासाठी असतात असं आम्ही समजत नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला होता. सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशावेळी काही पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला होता. सुजय विखेंसाठी अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडून का सोडण्यात आली नाही यावर पवार म्हणाले होते की, 'आपल्या मुलाचा हट्ट ज्याचा त्यानं पुरवावा. दुसऱ्यांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू यावर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधत शिवसेना सर्वसामान्य माणसांची आहे. इतरांची पोरं केवळ धुणीभांडी करण्यासाठी असतात, असा माझ्या पक्षाचा विचार कधीच नव्हता आणि असू शकत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव यांची टीका राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे वनगा प्रकरणामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेला टार्गेट केले आहे. 

खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यावेळी वनगा यांच्या मुलाला शिवसेनेत घेत पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. श्रीनिवास वनगा यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेत पाठवणार असा चंग शिवसेना नेत्यांनी बांधला होता. पालघरची पोटनिवडणूक शिवसेना-भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. याठिकाणी भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावितांना संधी दिली होती. राजेंद्र गावित यांनी पोटनिवडणुकीत बाजी मारत विजय मिळवला होता. मात्र शिवसेना-भाजपा युती जाहीर झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. त्यामुळे गावितांनी शिवबंधन हातात घेत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाउद्धव ठाकरेपालघरशरद केळकर