मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 200 पेक्षा कमी जागा जिंकल्या तर पुढील पंतप्रधान कोण होईल हे एनडीएचे घटक पक्ष ठरवतील असं विधान करुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मात्र राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
हिंदुत्वाच्या मुद्दा हाती घेत शिवसेना-भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीमुध्ये युती केली असली तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिवसेना अजूनही नाराज आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जे सरकार आलं ते भाजपचं होतं, पण 2019 च्या लोकसभेत सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं असेल, असं मत संजय राऊत यांनी एका संकेतस्थळाला मुलाखत देताना सांगितले आहे.
या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी विविध प्रश्नाला उत्तरे दिली. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राइकमुळे देशाचं वातावरण बदललेलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाला स्थिर सरकार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे एनडीएचे घटक पक्ष आणि भाजपा आम्ही मिळून 300 च्या वर जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जर भाजपने मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडून दिलं तर ते पंतप्रधान होतील. भाजपचा जो प्रचार चाललेला आहे तो मोदींच्याच नावाने चाललेला आहे. मोदींच्याच नावाने आपण सगळे मत मागत आहोत ना. तर मोदीच पंतप्रधान राहतील. भाजपामध्ये असा कोणताही दुसरा नेता दिसत नाही जो मोदींची जागा घेऊ शकेल. असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मात्र जर भाजपला 200 च्या खाली जागा मिळाल्या तर मित्र पक्षांना किंवा घटक पक्षांना पंतप्रधान निवडण्याची संधी मिळेल असं सूचक विधानही करायला संजय राऊत विसरले नाहीत.
देशासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मतभेद असले तरी आमच्या काही भूमिका आणि मागण्या आहेत. ज्या मुद्द्यांसाठी भांडलो त्यावर भाजपनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून युती केली. युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते. अशी कबुली संजय राऊत यांनी दिली.