Join us

आता पुढची चर्चा विजयसिंह मोहिते पाटलांशीच - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 3:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आर्शीवादाने रणजितसिंह भाजपात आले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आर्शीवादाने रणजितसिंह भाजपात आले. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आल्यानंतर माढाचा खासदार भाजपचाच असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत आता पुढची चर्चा विजयसिंह मोहिते पाटलांशीच होईल असं सांगून आगामी काळात विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपात प्रवेश करतील असे संकेत दिले. 

राजकारणातील आज एक महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राचे राजकारण जे मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होत नाही, ज्यांनी राज्यात ठसा उमटवला, त्याच घराण्यातील तिसरी पिढी युवा नेता रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपसोबतशी जोडलं गेलं, याचा मोठा आनंद होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोलापूर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र याठिकाणाहून अनेकांनी भाजपमध्ये केला आहे. त्यामुळे या भागात निश्चित भारतीय जनता पार्टीशी ताकद वाढली आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत मात्र एकमेकांच्या पायात पाय घालण्याचं काम विरोधकांमध्ये सुरु आहे त्यामुळे देशात एनडीएचे सरकार येईल, नरेंद्र मोदीच पुन्हा मुख्यमंत्री बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

सरकार तर येणारच आहे त्यामुळे आता आपल्याला एक काम करायचं आहे माढ्याचा खासदार या सरकारमध्ये भाजपाच असलाच पाहिजे, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रवेशामुळे आता चिंता नको असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारीचे संकेत दिले. त्याचसोबत विजयसिंह मोहिते पाटील हे जरी सध्या राष्ट्रवादीत असले तरी रणजितसिंह यांच्यारुपाने ते मनाने आपल्यासोबतच आहेत. त्यामुळे आता पुढची चर्चा विजयसिंह मोहिते पाटलांशीच आहे. राजकीय वाटचाल करत असताना मोहिते-पाटील घराण्याचा भाजपात आदर राखला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने येणाऱ्या काळात विजयसिंह मोहिते पाटीलही राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करतील का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकविजयसिंह मोहिते-पाटीलदेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाराजकारण