Join us

विरोधकांकडे आडवाणींसारखा भीष्माचार्य अन् मोदींसारखा कृष्णार्जुन नाही - शिवसेना 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 7:14 AM

आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे अशी टीका सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांवर केली आहे. 

मुंबई - विरोधकांनी नैतिकता, धैर्य व एकवाक्यता दाखवली तर सत्ताधारी बेबंद वागणार नाहीत. विरोधकांत आज आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे अशी टीका सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांवर केली आहे. 

आडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे. आता त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. त्यांनी मौन सोडले आहे. भीष्मांचे मुक्त चिंतन कोणती वावटळ उठवते ते पाहायचे. आडवाणींच्या मुक्त चिंतनाचे स्वागत मोदी यांनी केले आहे. हवा बदलत असल्याचे हे संकेत आहेत असंही शिवसेनेनं सांगितलं आहे. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे -अखेर लालकृष्ण आडवाणी यांनी मौन मोडले आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या एका प्रमुख संस्थापकाने हे बोलावे याचे प्रयोजन काय? आडवाणी यांनी पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून त्यांची ‘मन की बात’ जोरकसपणे मांडली 

विरोधक देशविरोधी कारवाया करीत आहेत व भाजपविरोधक खासकरून पाकिस्तानसारख्या शत्रूची भाषा बोलत असल्याच्या तोफा प्रचारात धडाडत आहेत. प्रचारात विकास, प्रगती, महागाई, बेरोजगारीसारखे मुद्दे मागे पडले व पाकिस्तान, राष्ट्रीय सुरक्षा यांना महत्त्व आले 

विरोधकांनी हवाई हल्ल्याचे पुरावे मागणे जसे चूक आहे तसे पुरावे मागणार्‍यांना देशविरोधी मानणे चूक आहे, असे आडवाणी यांच्या लिखाणातून दिसते. जे मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत हा भाजपच्या प्रचाराचा बिंदू आहे व विरोधकांना तो मान्य नाही. 

मोदी म्हणजे देश नाही. विरोधकांचे हे म्हणणे चुकीचे नसेलही, पण इंदिरा गांधी यांच्या बाबतीतही 1975 नंतर वेगळे घडत नव्हते. ‘इंदिरा इज इंडिया’ अशा घोषणा व गर्जना तेव्हा झाल्या व त्या गर्जना करणार्‍यांची पुढची पिढी ‘मोदी इज नॉट इंडिया’ असा प्रतिवाद करीत आहे. ‘इंदिरा इज इंडिया’ हा विचार लोकांच्या पचनी पडला नव्हता. 

निवडणुका या लोकशाहीचा उत्सव आहेत. त्या योग्य पद्धतीने आणि निःपक्ष पद्धतीने झाल्या पाहिजेत, असे मत आडवाणी यांनी मांडले आहे ते नेमके कोणासाठी? 

मोदी भारतीय संविधानाचा गळा घोटतील. पुन्हा निवडणुका होणार नाहीत. असा धुरळा उडवणे हा विरोधकांचा कचखाऊपणा आहे. विरोधकांनी ठामपणे उभे राहावे व त्यांना जे पटत नाही त्यास विरोध करावा. पण विरोधकांना एक नेता नाही आणि एक विचार नाही. त्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता नाही.

देशात सध्या जर काही चुकीचे घडत असल्याची कुणाची भावना असेल तर त्यास सत्ताधारी पक्ष जबाबदार नसून ढेपाळलेला विरोधी पक्ष सर्वाधिक जबाबदार आहे. 

मोदी हे संविधानाचा गळा घोटतील व पुन्हा निवडणुका होणार नाहीत असे जे म्हणतात ते देशातील जनतेचा अपमान करीत आहेत. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेभाजपालालकृष्ण अडवाणी