मुंबई - शिवसेना अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे. काही वर्षापूर्वी शिवसेनेने पर्युषण काळात जैन मंदिराच्या समोर मांसाहर शिजवत जैन धर्मांचा अपमान केला होता. ही घटना तुम्ही विसरु नका, मतदानाच्या माध्यमातून शिवसेनेला धडा शिकवा असं आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी अल्पसंख्याक समुदायाला केलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मिलिंद देवरा यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा जैन कार्डचा वापर काँग्रेस करणार असल्याचं स्पष्ट झालंय. व्यापारी बांधव मोदींच्या नावावर शिवसेनेला मत देतील असा शिवसेनेचा समज आहे. तो दूर करा, शिवसेनेचे उमेदवार प्रचारासाठी येतील तेव्हा त्यांना जाब विचारण्याचं काम करा, मतपेटीच्या माध्यमातून त्यांना उत्तर द्या असं मिलिंद देवरा यांनी सांगितले.
दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून अरविंद सावंत निवडणूक लढवत आहे. दक्षिण मुंबईत जैन समाजाची मते महत्त्वाची आहेत. त्यामुळे जैन मतं काँग्रेसच्या पारड्यात पाडण्यासाठी मिलिंद देवरा यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं बोललं जातंय.
काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे संजय निरुपम यांच्याकडून काढून मिलिंद देवरा यांना देण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ही जबाबदारी दिल्याबद्दल मिलिंद देवरा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार व्यक्त केले.
मागील काही वर्षांपासून पर्युषण पर्वाच्या काळात मुंबई आणि आसपासच्या काळात मांसबंदीचा मुद्दा गाजताना दिसला आहे. भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेतील पर्युषण काळात आठ दिवस मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला होता. यावरुनही अनेक वाद निर्माण झाले होते. शिवसेना-मनसे यासारख्या पक्षाने कायम याचा विरोध केला आहे.