शिवसेनेच्या 23 विजयी खासदारांना घेऊन काशीविश्वेश्वराला जाणार - आदित्य ठाकरेंचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:32 PM2019-03-22T15:32:48+5:302019-03-22T15:36:24+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार असल्याने शिवसेनेच्या विजयी 23 खासदारांना घेऊन काशीविश्वेश्वराला जाणार असल्याचा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार असल्याने शिवसेनेच्या विजयी 23 खासदारांना घेऊन काशीविश्वेश्वराला जाणार असल्याचा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. प्रताप फाउंडेशनच्या वतीने शिवार उद्यान येथे उत्तर भारतीयांचा होळी मिलन समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या रक्ताचा, शरीराचा जो भगवा रंग आहे, तो उतरू देऊ नका. देशाचा पंतप्रधान काशीमधून येतो, म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात नाही, तर सोबत उभे आहोत. माझ्यासाठी कुणी उत्तर हिंदुस्थानी, कुणी दक्षिण हिंदुस्थानी, कुणी पूर्व हिंदुस्थानी असे नाही तर माझ्यासाठी सर्व हिंदू आणि हिंदुत्ववादी आहेत. मी माझे भाषण मराठीत करत आहे, ते मी हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि अन्य भाषेत केले असते, मात्र मी येथे भाषण नाही तर ‘दिल की बात’ करण्यासाठी आलो आहे असं त्यांनी सांगितले.
तुमच्यापैकी अनेक जण माझ्या जन्मापूर्वीपासून येथे राहत आहेत. माझ्यापेक्षा चांगले मराठी बोलत आहेत, मग त्यांना मी वेगळे कसे समजू! होळीच्या सणानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.याप्रसंगी शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, युवासेना सचिक पूर्वेश सरनाईक, शंकर वीरकर, धनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा वेग आला असून प्रत्येक नेते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र निवडणुकीनंतर मतदारांचा कौल कोणत्या पक्षाला मिळेल हे निकालानंतर स्पष्ट होईल.