कोल्हापुरातून शिवसेना-भाजपा युती प्रचाराचं रणशिंग फुंकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 09:51 AM2019-03-13T09:51:54+5:302019-03-13T09:53:03+5:30
शिवसेना-भाजपा युतीचा पहिली महासभा येत्या 24 मार्च रोजी कोल्हापुरात पार पडणार आहे. कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शिवसेना-भाजपा युती प्रचाराचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी 11 एप्रिलला मतदारन होणार असल्याने राजकीय पक्ष प्रचारांकडे लक्ष देत आहे. शिवसेना-भाजपा युतीचा पहिली महासभा येत्या 24 मार्च रोजी कोल्हापुरात पार पडणार आहे. कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शिवसेना-भाजपा युती प्रचाराचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्यातरी शिवसेना-भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. युती जाहीर झाल्यापासून जागा वाटपाचा फॉम्युलाही युतीने नक्की केलाय, तसेच आता प्रचाराचा नारळ फोडण्याची रणनिती आखली आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. जागावाटपाबाबतची आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येतंय.
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 जागांवर तर भाजपा 25 जागांवर निवडणूक लढणार आहे, काही जागांवरुन युतीत सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी युतीतील नेत्यांची चर्चा झाली.
यापुढे युतीच्या उमेदवारांचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी, प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. येत्या दि,१५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे महाराष्ट्रात सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा युतीचा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याची घोषणाही येत्या दोन दिवसांत होणार आहे अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
बैठकीत ठरलेल्या युतीच्या रणनिती प्रमाणे भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा येत्या शुक्रवारी दि १५ मार्च रोजी दुपारी अमरावतीला होणार असून युतीचा दुसरा पदाधिकारी मेळावा दि, १५ रोजी रात्री नागपूरला होणार आहे.युतीचा तिसरा मेळावा येत्या रविवार दि,१७ मार्च रोजी दुपारी औरंगाबादला होणार असून याच दिवशी युतीचा चौथा मेळावा दि,१७ मार्च रोजी रात्री नाशिकला होणार आहे. युतीचा पाचवा मेळावा सोमवार दि,१८ मार्च रोजी दुपारी नवी मुंबईत होणार असून याच दिवशी युतीचा सहावा मेळावा दि१८ मार्च रोजी रात्री पुण्यात होणार असल्याचे या बैठकीत ठरले.
या बैठकीला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर उपस्थित होते.तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. विशेष म्हणजे आजच्या या बैठकीत लोकसभेचं जागावाटप किंवा वाटाघाटींवर कुठलीही चर्चा झालेली नाही, तर उलट खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली अशी सूत्रांची माहिती आहे.
Maharashtra: CM Devendra Fadnavis met Shiv Sena chief Uddhav Thackeray at the latter's residence in Mumbai last night. pic.twitter.com/PnkNIIY8p8
— ANI (@ANI) March 13, 2019