मुंबई - भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गांधीनगरला गेले होते त्यावरुन विरोधी पक्षांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेवर उद्धव यांनी सामना संपादकीयमधून चांगलाच समाचार घेतला.
अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही त्याठिकाणी गेलो हे एकमेव कारण नव्हते तर,राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा यानिमित्ताने झाला.अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, राजनाथ सिंहांपासून ‘रालोआ’चे अनेक दिग्गज या मेळाव्यात होते. आम्ही सगळय़ांनी एकत्र येऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्र ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याच ‘मिशन शक्ती’तून देशाला नवी प्रेरणा मिळते. अखंड हिंदुस्थानचा विचार करतो व त्यासाठीच दिल्लीवर भगवा झेंडा फडकत राहिला पाहिजे. भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.
सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आमचे व्यवस्थित जुळले व सर्व कटुता विसरून आम्ही महाराष्ट्र व देशहितासाठी एकत्र आलो. त्यामुळे काहींना जी पोटदुखी लागली आहे त्यावर सध्या तरी उपचार नाहीत. हिंदुत्वासाठी, देशहितासाठी आम्ही एकत्र आल्याने विरोधकांच्या तोंडात जाणारा लोण्याचा गोळा खाली पडला हे त्यांचे खरे दुःख आहे.
शिवसेना-भाजप या दोन हिंदुत्ववादी विचार असलेल्या पक्षांतील कटुता मिटली ही फितुरी आहे असे कुणास वाटत असेल तर त्यांच्या डोक्याचा अजहर मसुदी खिमा झाला आहे किंवा जैश-ए-मोहम्मदच्या अड्डय़ांवर बसून हे लोक रोज ‘ढोसत’ असावेत. ‘
युती’चे तोरण बांधल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे मनोरथ धुळीस मिळाले आहे आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा हे चिमूटभर उरलेले पक्षही धुळीस मिळालेले दिसतील. आम्ही पुन्हा ‘युती’ केली हा आमचा व महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न आहे.
महाराष्ट्रास तडे देण्याचे संकट ‘युती’मुळे टळले. आता ही फितुरी आहे असे जर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना वाटत असेल तर या मंडळींना हुतात्मा स्मारकावर उभे करून खेटराने मारले पाहिजे. मुळात जे ‘फितुरी’ची भाषा करीत आहेत त्यांचा एक पाय तुरुंगात आहे व उद्या राज्यात ‘युती’ची मजबूत सत्ता येताच दुसरा पायही तुरुंगात जाणार आहे.
कुणी जलसिंचनाच्या नावाखाली स्वतःचे आर्थिक ‘सिंचन’ करून घेतले आणि राज्याच्या तिजोरीशी फितुरी केली, तर कुणी बीडच्या जिल्हा बँकांत घोटाळे केले. यास फितुरी नाही म्हणायचे तर काय सचोटीचे प्रयोग म्हणायचे?
विरोधी पक्षाला जाग आली ती शिवसेनेच्या जागरूक भूमिकेने. विरोधी पक्षाची कर्तव्ये काय ते त्यांना आम्ही दाखवून दिले. ‘युती’ होताच जनहिताचे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले. ही फितुरी असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गद्दारांची संपूर्ण पोलखोल करावी लागेल.