Join us

'...जर आम्ही वेगळे लढलो असतो तर नुकसान झालं असतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 8:20 AM

कोणताही नेता नसताना विरोधी पक्षाचा ना आकार ना उकार अशी परिस्थिती आहे. अशा विरोधी पक्षांची एक मोट जबरदस्तीने बांधण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या हातात देश द्यायचा काय ?

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने युती केली. मात्र गेली साडेचार वर्ष एकमेकांशी भांडून निवडणुकीच्या तोंडावर युती केल्याने अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मात्र आम्ही वेगळे लढलो असतो तर कोण किती जिंकलं असतं याच्यापेक्षा कुणाचं किती नुकसान झालं असतं याचा विचार करायला हवा. कोणताही नेता नसताना विरोधी पक्षाचा ना आकार ना उकार अशी परिस्थिती आहे. अशा विरोधी पक्षांची एक मोट जबरदस्तीने बांधण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या हातात देश द्यायचा काय ? असा सवाल करत ज्याच्यामुळे आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता तो दुरावा दूर करण्याचा प्रयत्न झाला असल्याने हिंदुत्वावर आम्ही तेव्हा युती केली होती. आजही हिंदुत्व हा धागा आहे असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली त्यामध्ये उद्धव यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. 

युती करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. विरोधकांकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली होती. यावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका जाहीर होण्याआधी मी एका वेगळय़ा भूमिकेत नक्कीच होतो. गेली चार वर्षं-पाच वर्षं शिवसेना सातत्याने जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडत आहे. राज्यात तर सोडाच, पण संपूर्ण देशात विरोधी पक्ष गलितगात्र होऊन पडले होते आणि जनतेचा आवाज कुणी उठवत नव्हतं, तेव्हा एकटी शिवसेना जनतेचा आवाज बुलंदपणे उठवत होती. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे एकदा नव्हे, तर दोन वेळा मला भेटायला आले. घरी आले आणि जेव्हा युतीचं नक्की ठरलं तेव्हा मी त्यांच्यासमोर जनतेचे प्रश्न मांडले. ते मानले गेले, स्वीकारले गेले आणि त्यावर उपाययोजनासुद्धा सुरू झाली असेल तर मग संघर्ष कशासाठी करायचा? म्हणून युती केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. 

सत्तेमध्ये असूनही तुम्ही जनतेचे प्रश्न मांडू शकला असता असा प्रश्न केला असता त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारमध्ये आमचे मंत्री कॅबिनेटमध्ये आणि आमदार विधिमंडळात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतच होते. जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधी पक्षाची भूमिका वेळोवेळी शिवसेनेने निभावली असल्याचं त्यांनी सांगितले. 

मी जे मुद्दे मांडले ते भारतीय जनता पक्षाने आता स्वीकारले. शेतकऱ्यांचे प्रश्न होते, नाणारचा मुद्दा होता, राममंदिराचा मुद्दा होता. सगळे मुद्दे आम्हीच मांडले, हिरीरीनं मांडले. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी उचलायला हवे होते ते मी जनतेच्या हितासाठी उचलले. युती झाल्यानंतर आमच्यात थोडा गलथानपणा आला. म्हणून 25 वर्ष युतीत सडली असं वक्तव्य केलं तो जो काही गलथानपणा होता तो आता राहणार नाही. विचार पोहोचवणं, विचार पसरवणं हा काही गुन्हा नाही. विरोधी पक्षाकडे सत्ता गेली तर पंतप्रधानपदावरुनही त्यांच्यात पुन्हा भांडणं होणार त्यामुळे आता जर का आपण मागे गेलो तर या देशात हिंदू हा हिंदू म्हणून उभा राहणं केवळ कठीण होईल त्यामुळे हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

पाहा व्हिडीओ

टॅग्स :लोकसभा निवडणूकशिवसेनाभाजपानिवडणूकअमित शहादेवेंद्र फडणवीस