Join us

शरद पवार निर्लज्जासारखं सत्तेच्या मागे धावले - उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 21:32 IST

परदेशी सरकार नको म्हणून सोनिया गांधी यांना विरोध शरद पवारांनी केला आणि निवडणुकीनंतर पुन्हा निर्लज्जासारखं सत्तेसाठी काँग्रेसच्या मागे धावले असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला

मुंबई - राफेलवरुन शरद पवार जे बोलले त्यावर पर्रिकरांच्या मुलाने पवारांचा बुरखा फाडला. गेलेल्या व्यक्तींवर राजकारण तरी करु नका, अटलबिहारी वाजपेयींच्या विरोधातही असचं रान उठवलं गेलं आणि वाजपेयी सरकार पडलं. परदेशी सरकार नको म्हणून सोनिया गांधी यांना विरोध शरद पवारांनी केला आणि निवडणुकीनंतर पुन्हा निर्लज्जासारखं सत्तेसाठी काँग्रेसच्या मागे धावले असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील जाहीर सभेत केला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपाचे उमेदवार गजानन किर्तीकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या प्रचारसभेत उद्धव यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडली. 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हाला लाज वाटते का विचारण्याआधी स्वत:ला आरशात बघितलं का? इतक्या वर्षात किती घोटाळे काँग्रेस-राष्ट्रवादीने केले ते घोटाळे मोजताना बाराखडीही कमी पडेल. आघाडी म्हणजे भोकं पडलेला फुगा, आघाडीला आकार नाही, राजकारण करताना आरोप करा, आम्हाला लाज वाटते का विचारता? मागील दहा वर्षात जेवढे घोटाळे झाले असतील तेवढेच काढा मग आम्हाला विचारा लाज वाटते का? अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

तसेच शौचालयातील नॅपकीनमध्येही घोटाळा करणारी औलाद आहेत. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसोबत एकही फोटो पाहिला नाही आणि काल चारा छावणीमध्ये जाऊन चौकशी करता. आघाडीच्या काळात या चारा छावणीतही यांनी घोटाळा केला. लोकं विसरत नाहीत. पाच वर्षापूर्वी जनतेने तुमच्या पार्श्वभागावर लाथ मारुन बाहेर काढले आणि आम्हाला विचारता लाज वाटते का? असं तुम्ही बोलता. गेली 50-60 वर्ष  माजलेली लोकं पाच वर्षात सुधारतील का? शरद पवार संरक्षणमंत्री असताना संरक्षण भुखंडही लाटण्याचा प्रयत्न केला. लाज वाटेल असं आम्ही कधी केलं नाही आणि आयु्ष्यात कधी करणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला. 

दरम्यान आघाडीवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता हवी ती देशाच्या सेवेसाठी हवी. सत्ता उबवण्यासाठी आम्हाला सत्ता नको. गेली 50-60 वर्षे देश पिळवटून टाकला आहे. आघाडीचा धुतराष्ट्र झाला असेल पण महाराष्ट्राचे डोळे उघडे आहेत. हेच लोकं देशावर भगवा फडकवणार आहे. देव, देश अन् धर्मासाठी आम्ही युती केली. देश सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीला निवडून द्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

टॅग्स :लोकसभा निवडणूकशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसमुंबई उत्तर पश्चिममहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019