मुंबई - गोंदीया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात तिहार तुरुंगातील कोणीतरी आपले तोंड उघडेल आणि मग आपणही तिहार जेलमध्ये जाऊ ही भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना असल्याचा आरोप केला. हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे. मोदी यांनी टाकलेल्या कोड्याने अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, पण नुसत्याच लटकवत ठेवलेल्या तलवारी भ्रष्टाचार कसा संपवणार असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
आजकाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना रात्रीची झोप येत नाही. त्यांना आपली झोप तिहार जेलमध्ये जमा झाल्याचा भास होत आहे. हे नेते लवकरच तिहार तुरुंगात जातील असं पंतप्रधानांनी सांगितलं. मोदी यांनी भंडाऱ्यात येऊन एक कोडे टाकले व हसत हसत निघून गेले. त्यामुळे कुणाची झोप उडाली? तिहार जेलमध्ये कोण आहे व त्याने तोंड उघडले तर काँगेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, पंतप्रधानांनी असे कोड्यात बोलायला नको होते व जे आहे ते स्पष्ट सांगून संभ्रम दूर करायला हवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे तिहार जेलमध्ये अशा काही व्यक्ती आहेत व त्या आधीच्या सरकारात ‘लॉबिंग’ करत होत्या. उद्योग व नागरी हवाई क्षेत्रात नियम मोडून कामे करून देणाऱया या व्यक्तींनी स्वतः कमाई केली व काही मंत्र्यांना कमाई करून दिली.
या व्यक्तींत दीपक तलवारचे नाव सातत्याने घेतले जाते. तलवार सीबीआयच्या पकडीत आहे व त्याने विमान उड्डाण, विमानतळनिर्मितीत काही ‘गेम’ वाजवल्याची चर्चा होतीच. शिवाय इतर अनेक परदेशी कंपन्यांचा हस्तक म्हणूनही हे तलवार महाशय सत्ताधाऱ्यांच्या आतील वर्तुळात फिरत होते.
तलवार यांच्या पोटात अनेक राजकारण्यांची व आजीमाजी सत्ताधाऱ्यांची रहस्ये दडली आहेत. पोटातली रहस्ये ओठात येऊ नयेत म्हणून त्यापैकी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या कोडय़ाचे उत्तर ‘तलवार’ तर नाही ना? मोदी यांनी टाकलेले कोडे शब्दकोडय़ाचा टाइमपास नाही, तर देशातील भ्रष्टाचार, सुरक्षा व उद्योग व्यवसायाशी निगडित असे हे कोडे आहे.
पंतप्रधानांनी गोंदियात येऊन हे कोडे घालण्यापेक्षा दिल्लीतून जाहीरपणे ही तलवार फिरवली असती तर अनेक भ्रष्टाचाऱ्यांची गर्दन उडाली असती. मोदी यांच्या काळात रॉबर्ट वढेरा हे चौकशीला सामोरे गेले व हे ‘महान राष्ट्रभक्त’ सध्या अंतरिम जामिनावर आहेत. मनी लॉण्डरिंगच्या प्रकरणाची ‘तलवार’ रॉबर्टवर लटकलेली आहेच.
देशद्रोहाचे कलम रद्द करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले तसे मनी लॉण्डरिंग गुन्ह्याचे कलमही ते रद्द करणार आहेत काय?