Video: शिवसेना आमदाराच्या मनात नेमकं चाललय तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 08:08 PM2019-04-11T20:08:22+5:302019-04-11T20:08:51+5:30
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी नेत्याच्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि अशोक पाटील यांनी संजय पाटील हे भावी खासदार असल्याचा उल्लेख केला होता.
मनीषा म्हात्रे
मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी नेत्याच्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि अशोक पाटील यांनी संजय पाटील हे भावी खासदार असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे ईशान्य मुंबईत अजूनही शिवसेना-भाजपची दिलजमाई झाली आहे का? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
दरम्यान यासंदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आमदार अशोक पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत जेवणाचा बेत आखला. त्यावेळी मी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या म्हणजे मी पक्ष सोडून त्यांच्याकडे गेलो नसून आम्ही मातोश्रीचे आदेश डावलणार नाही अशी स्पष्टोक्ती आमदार अशोक पाटील यांनी दिली आहे.
...जेव्हा शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयासाठी शुभेच्छा देतात
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना-भाजपात तणावाचं वातावरण होतं, कोणत्याही परिस्थितीत किरीट सोमय्या यांचा प्रचार करणार अशी ठाम भूमिका शिवसैनिकांनी घेतल्याने अखेर भाजपाला या मतदारसंघातून मुंबई महापालिकेचे गटनेते मनोज कोटक यांना संधी देण्यात आली. किरीट सोमय्या यांनी थेट मातोश्रीला आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्यामुळे शिवसैनिकांचा राग किरीट सोमय्या यांच्यावर होता. त्यामुळे विद्यमान खासदार असतानाही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सोमय्या यांना तिकीट नाकारण्यात आलं.
याच मतदारसंघात असलेले शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनीही किरीट सोमय्यांविरोधात दंड थोपटले होते. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष म्हणून त्यांना आव्हान देऊ, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना मातोश्रीकडून भेटीसाठी वेळ देण्यात आली नाही. शिवसैनिकांची नाराजी बघता भाजपाच्या मनोज कोटकांसाठी ही लोकसभा निवडणूक जड जाणार आहे. त्यामुळेच की काय निवडणुकीत कोणतीही जोखीम नको म्हणून ईशान्य मुंबईचे भाजपा-शिवसेनेचे उमेदवार मनोज कोटक हे शिवसेना आमदाराच्या घरी जेवणासाठी गेले होते. मात्र शिवसैनिकांची नाराजी दूर झाली का? हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच.
पाहा व्हिडीओ