Join us

Lok Sabha elections 2019; तुमचं ठरलं, आमच काय ? घटकपक्षांचा भाजप-शिवसेनेला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:01 PM

राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी येत्या आठवडाभरात भाजप-शिवसेनेने लोकसभा जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही वेगळा विचार करू असा इशाराच शिवसेना-भाजपला दिला आहे

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्षाला कामाला लागले असताना महायुतीतील छोट्या पक्षांशी अवस्था तुमचं ठरलं, आमचं काय ही विचारण्यासारखी झाली आहे. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी येत्या आठवडाभरात भाजप-शिवसेनेने लोकसभा जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही वेगळा विचार करू असा इशाराच शिवसेना-भाजपला दिला आहे. 

भाजप-शिवसेना युतीची घोषणा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली यामध्ये आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना 23 जागा तर भाजपा 25 जागांवर लोकसभा निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे जाहीर केले. मात्र भाजपच्या मित्रपक्षांना जागा सोडणार नसल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाला, महादेव जानकर यांच्या रासपला आणि सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला लोकसभेसाठी भाजप जागा सोडणार का हा प्रश्न आता समोर येतोय. 

आघाडी आणि युतीच्या राजकारणात छोट्या पक्षांशी फरफट होत असल्याचा आरोप महादेव जानकर यांनी केला. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने एमआयएमसोबत एकत्र येऊन वंचित आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपात न्याय मिळाला नाही तर राज्यात चौथी आघाडी स्थापन करू असंही महादेव जानकर म्हणाले. 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत एक जागा आरपीआयला सोडावी अशी मागणी शिवसेना-भाजपाकडे लावून धरली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे रासपला एक जागा सोडावी अशी महादेव जानकर यांनी मागणी केली आहे. तर राजू शेट्टी यांच्याविरोधात सदाभाऊ खोत यांनी दंड थोपटले आहेत. हातकंणगले जागेसाठी खोत आग्रही आहेत.  

रामदास आठवले हे दक्षिण मुंबईतील जागेसाठी आग्रही आहेत.मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी महादेव जानकर यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तर माढा मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती. तर सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांच्याविरोधात रामदास आठवले यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत होणाऱ्या जागावाटपावरून युतीत सध्यातरी घटक पक्ष नाराज आहे असंच चित्र दिसत आहे. 

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९महादेव जानकरसदाभाउ खोत रामदास आठवले