Join us

‘गुड प्रॉब्लेम’ सोडविण्यासाठी भाजपला करावी लागतेय कसरत

By यदू जोशी | Published: April 16, 2024 5:02 AM

तीन मित्रपक्षांच्या तगड्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष, मतदारसंघनिहाय होणार व्युहरचना 

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका उमेदवारांसाठी तीन-तीन पक्षांचे नेते प्रचार मोहिमेचे श्रेय घेत असल्याने आणि त्याचवेळी एकाचवेळी व्यासपीठावर एकत्र येण्याचे टाळत असल्याने भाजपच्या निवडणूक प्रचार समितीला नव्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तीन पक्षांतील नेत्यांमध्ये श्रेयाची लढाई रंगू नये यासाठी आता मतदारसंघनिहाय लक्ष दिले जात आहे. 

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, हा आमच्यासाठी ‘बॅड प्रॉब्लेम’ नाही, हा ‘गुड प्रॉब्लेम’ आहे. त्यामुळेच तो अधिक संवेदनशीलपणे हाताळावा लागत आहे. विरोधी पक्षांचे हल्ले, टीका हे आक्रमकपणे परतवता येते पण इथे तसे नाही. सगळे आपलेच आहेत आणि कोणालाही न दुखावता प्रचाराचे नियोजन करावे लागत आहे. प्रदेश पातळीवरील चार-पाच भाजप नेत्यांना त्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पाठविण्यात आले आहे. भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि इतर लहान पक्षांचे नेते प्रचारात एकत्रितपणे उतरले असल्याने काही ठिकाणी सुप्त संघर्ष सुरू आहे. जवळपास २५ लोकसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांचे तगडे नेते आहेत. आपापल्या हिशेबाने ते प्रचार यंत्रणा राबवत आहेत. त्यामुळे समन्वयाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या संदर्भात रायगडचे उदाहरण प्रामुख्याने दिले जात आहे. अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे आमदार असे परपंरागत चित्र या मतदारसंघात राहिले. मात्र शिवसेनेचे या मतदारसंघातील आमदार शिंदेंसोबत गेले आणि पुढे अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने एकमेकांशी जुळवून घेताना अडचणी येत असल्याचा अहवाल भाजपच्या स्थानिक यंत्रणेने प्रदेश भाजपला दिला असल्याची माहिती आहे. 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे उमेदवार आहेत. गोंदियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या पुढाकाराने होत असलेला प्रचार, त्यांच्या पुढाकाराने होत असलेल्या सभांपासून स्थानिक भाजपसमर्थित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वत:ला दूर ठेवले आहे. आता अग्रवाल यांच्या पुढाकाराने होत असलेल्या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेथे मंगळवारी जात आहेत. लोकसभेला कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाले, यावर विधानसभेची उमेदवारी अवलंबून राहणार असल्याने महायुतीतील तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि भाजप नेत्यांमध्येही  आपसातच चढाओढ सुरू झाली आहे.

शेतमालाच्या भावावरून नाराजी - कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्याने नाराजीचा सामना भाजपच्या नेत्यांना प्रचारात करावा लागत आहे. विशेषत: विदर्भात हा अनुभव येत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी आम्हाला चांगले भाव मिळाले पण गेल्या वर्ष-दीड वर्षात ते पडले, तेव्हा केंद्र व राज्यातही तुमचेच सरकार होते ना? असा सवाल शेतकरी करत आहेत.- आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडल्याने त्याचा फटका बसला, हे एक आणि अन्य कारणेही आम्ही मांडतो पण शेतकऱ्यांचे समाधान होत नाही, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. 

टॅग्स :मुंबईभाजपा