Join us

लोकसभा निवडणूक: जागा वाटपाआधीच महायुतीच्या नेत्यांचे एकमेकांना फटाके; जाहीरपणे विधाने

By यदू जोशी | Published: March 12, 2024 6:07 AM

लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याआधीच आठ ते दहा मतदारसंघांमध्ये सुंदोपसुंदी.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महायुतीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला अद्याप ठरू शकलेला नसतानाच आता तीन पक्षांचे नेते एकमेकांविरुद्ध जाहीरपणे बयाणबाजी करू लागले आहेत. 

बारामती मतदारसंघ म्हणजे पवारांचा सातबारा नाही, या शब्दात माजी राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सुनावले. जागा वाटप सन्मानाने करा, आमचा अपमान कराल तर तुम्हीही सन्मानाला मुकाल, असा हल्लाबोल शिंदे समर्थक आ. भरत गोगावले यांनी केला. महायुतीत आठ ते दहा जागांवरून सुंदोपसुंदी दिसत आहे. 

बारामती हा काही पवारांचा सातबारा नाही

शिवतारे म्हणाले की, अजित पवार यांच्या उमेदवारासाठी प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही. पवारांविरुद्ध बारामती मतदारसंघात साडेपाच लाख लोकांनी मतदान केले होते. बारामती हा काही पवारांचा सातबारा नाही. अजित पवारांनी मला कसा त्रास दिला, नालायकपणाचा कळस गाठला हे लोकांना माहिती आहे, तेच त्यांना धडा शिकवतील. संसदरत्न म्हणून पुरस्कार घेणाऱ्या सुप्रिया सुळेंनी मतदारसंघासाठी काहीही केलेले नाही. दोन्ही पवारांची कटकट संपवायची आहे. 

अजित पवारांनी तीन वेळा खंजीर खुपसला

माजीमंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे अजित पवार यांचे कट्टर विरोधक मानले जातात. पवारांच्या तालुका अध्यक्षांकडून आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला होता. त्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते.  त्यांच्या कन्या अंकिता यांनी अजित पवारांनी आपल्या वडिलांच्या पाठीत एकदा नाही तीनवेळा खंजीर खुपसला, असा आरोप केला होता.

आम्हाला सन्मानाने जागा द्या, नाही तर...

शिवसेनेला भाजप दोन आकडीही जागा देणार नाही, अशी चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नेते आ. भरत गोगावले यांनी सोमवारी भाजपला सुनावले. आम्हाला सन्मानाने जागा द्या, नाही तर मग तुमचाही सन्मान राहणार नाही. सन्मानजनक जागा द्याव्याच लागतील, असे ते म्हणाले. गोगावले आणि शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील आमदारांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला आहे. तशी भावना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंजवळ बोलून दाखविली आहे.

माझे वडील किंवा मीच उमेदवार असेल

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे माजी आमदार आणि शिंदे गटाचे असलेले अभिजित अडसूळ यांनी, अमरावतीची जागा शिवसेनेकडेच असेल आणि माझे वडील आनंदराव अडसूळ किवा मीच तिथे उमेदवार असेल, असे जाहीर केले. रवी राणा व नवनीत राणा बालिश आहेत, न केलेल्या कामांचे श्रेय लाटतात, असे ते म्हणाले. ‘माझ्या विरोधकांना माझी फार काळजी आहे, ते माझ्याविरोधात एकवटले असले तरी जनता माझ्यासोबत आहे, असे प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी दिले.  

इतर ठिकाणीही ठिणगी...

- कल्याणची जागा आम्हीच लढणार, असे म्हणत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला आधीपासूनच विरोध केला होता. 

- रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये उमेदवारीवरून भाजप विरुद्ध शिवसेना आमनेसामने आहेत. ठाण्याच्या जागेवरूनही या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच आहे. 

- भंडारा-गोंदियाच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीनेही दावा केल्याचे पेच आहे. गडचिरोलीतही तसेच चित्र दिसते. यवतमाळ-वाशिमच्या जागेवर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. 

- अशा विविध ठिकाणी सध्या लोकसभेच्या जागांवरून सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवार