अमित ठाकरेंना लोकसभेची उमेदवारी दिली तर निवडून येतील? दक्षिण मुंबईतील समीकरण काय?

By मोरेश्वर येरम | Published: April 2, 2024 01:30 PM2024-04-02T13:30:27+5:302024-04-02T13:33:40+5:30

South Mumbai, Amit Thackeray: द.मुंबईत गेल्या दोन टर्म शिवसेनेचा उमेदवार जिंकला खरा पण काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

lok sabha elections 2024 what are the chances for mns leader amit thackeray in south mumbai constituency | अमित ठाकरेंना लोकसभेची उमेदवारी दिली तर निवडून येतील? दक्षिण मुंबईतील समीकरण काय?

अमित ठाकरेंना लोकसभेची उमेदवारी दिली तर निवडून येतील? दक्षिण मुंबईतील समीकरण काय?

मुंबई-

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय आणि जागावाटपावरुन युती-आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुंबईचा विचार करायचा झाल्यास दक्षिण मुंबई मतदार संघ सध्या सर्वात चर्चेचा ठरत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर सेना-भाजपासोबत मनसेची युतीची बोलणी सुरू आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यापाठोपाठ मनसे लढवू इच्छित असलेल्या जागांमध्ये दक्षिण मुंबई ही सर्वात महत्वाची जागा मानली जात आहे. सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.  या जागेवर थेट ठाकरे परिवारातील उमेदवार देऊन धक्कातंत्र वापरण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि अमित ठाकरेंचं नाव पुढे आलं. 

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या दक्षिण मुंबई मतदार संघातून गेली दोन टर्म शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. अरविंद सावंत हे इथले विद्यमान खासदार असून ते सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. सावंत सलग दुसऱ्यांदा या मतदार संघातून निवडून आले असले तरी त्यावेळी शिवसेना-भाजपा युती होती आणि मुख्य म्हणजे शिवसेनेत फूट पडली नव्हती. सध्याची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. याच मतदार संघातून १९८४, १९८९ आणि १९९१ मध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यानंतर १९९६ साली भाजपाच्या जयवंतीबेन मेहता, पुढे १९९८ साली पुन्हा मुरली देवरा, मग १९९९ साली पुन्हा जयवंतीबेन मेहता निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००४ आणि २००९ साली मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी सलग दोन वेळा काँग्रेसकडून मतदार संघावर दबदबा निर्माण केला. आता तेच मिलिंद देवरा शिंदे गटात सामील झाले आहेत आणि त्यांची राज्यसभेवर वर्णी लागलीय. त्यामुळे महायुती बळकट झाली आहे. 

दक्षिण मुंबई मतदार संघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या जागांचा समावेश आहे. सहापैकी तीन जागा शिवसेनेकडे, दोन भाजपाकडे आणि एक सध्या काँग्रेसकडे आहे. पण २०२२ मधल्या राजकीय भूकंपानंतर या मतदार संघावर मोठा परिणाम झाला. सहा पैकी दोन जागा भाजपकडे आहेत. तीन ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले होते पण त्यातील भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव शिंदे गटात गेल्या आहेत. तर वरळीतून आदित्य ठाकरे आणि शिवडीतून अजय चौधरी या जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे विधानसभेच्या दोन जागांवर उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. मुंबादेवी मतदार संघावर काँग्रेसच्या अमीन पटेल यांचं वर्चस्व आहे. 

लक्षात घेण्यासारखी बाब अशी की गेल्या दोन टर्म शिवसेनेचा उमेदवार जिंकला खरा पण काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. २०१४ मध्ये शिवसेनेला ४९ टक्के मतं होती, तर काँग्रेसला ३२ टक्के, २०१९ मध्ये शिवसेनेला ५३ टक्के तर काँग्रेसला ४० टक्के मतं होती. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये ८ टक्क्यांची, तर शिवसेनेच्या मतांमध्ये ४ टक्क्यांची वाढ होती. आता ही आकडेवारी पाहता लोकसभेची लढत तुल्यबळ होऊ शकते यात शंका नाही. याच पार्श्वभूमीवर युतीकडून या मतदार संघासाठी दमदार उमेदवार शोधला जातोय. 

'लोकमत'चे सहयोगी संपादक यदु जोशी म्हणतात,

"आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत आणि हा विधानसभा मतदार संघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात येतो. याच मतदार संघात आता अमित ठाकरे यांचं लोकसभेसाठी महायुतीकडून नाव समोर येत आहे. मनसेचे ते उमेदवार असू शकतात. त्यांना भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा पाठिंबा असेल. त्यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याशी होऊ शकतो. तसं झालं तर ही महाराष्ट्रातील अतिशय रंजक लढत असेल. अमित यांच्याबद्दल उत्सुकता असेलच पण ही लढाई सोपी नाही. दक्षिण मुंबईचा स्वभाव वेगळा आहे. इथे व्यापारी, मराठी आणि मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात राहतो. या तिन्ही मधून जे दोन घटक ज्याच्या सोबत जातात तो उमेदवार जिंकतो असा अनुभव आहे. मागच्या वेळी अरविंद सावंत यांना भाजपची साथ होती. त्यामुळे व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं. यावेळी अमित ठाकरे जर मैदानात उतरले तर त्यांच्यासाठी मोठी परीक्षा असेल" 

मनसेची दक्षिण मुंबईत ताकद किती?
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या बाळा नांदगावकर यांना १ लाख ५९ हजार ७२१ मतं मिळाली होती. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला होता आणि बाळा नांदगावकरांची मतं निर्णायक ठरली होती. काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडून आले होते. मग २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवडीतून बाळा नांदगावकर निवडून आले होते. तर भायखळा विधानसभेतून मनसेचे संजय नाईक दुसऱ्या क्रमांकावर होते. पुढे २०१४ मध्ये नांदगावकर लोकसभा लढले. त्यांना ८४ हजार ५८८ मतं होती. 

२०१९ मध्ये मनसेने लोकसभा लढवली नाही. विधानसभा निवडणुकीतही शिवडी मतदार संघातून बाळा नांदगावकरांऐवजी मनसेच्या संतोष नलावडे यांनी निवडणूक लढवली होती. ते ३८ हजार ३५० मतांनी दुसऱ्या स्थानावर होते. आता लोकसभेसाठी बाळा नांदगावकरांऐवजी थेट ठाकरे ब्रँडचा उमेदवार दिल्यानं तोही फायदा पक्षाला होऊ शकतो असाही विचार केला जात आहे. 

शिवडी, भायखळ्यात मनसेची स्वत:ची अशी चांगली मतं आहेत असं म्हणता येईल. त्यात भाजपा-शिंदे आणि अजित पवार गटाची साथ मिळाली इतर मतदार संघातही इंजिनवर मत देणारा मतदार तयार करता येईल. असं असलं तरी ठाकरे गटानंही वरळी, लालबाग, परळ हे भाग चांगले बांधून ठेवलेत. अरविंद सावंत यांनी आपल्या दोन टर्ममध्ये मतदार संघावर चांगली पकड निर्माण केली आहे. त्यामुळे ही लढत नक्कीच अटीतटीची राहिल. 

शिंदे गटाकडून सध्या या जागेसाठी कुणी उमेदवार चर्चेत नसला तरी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांनी तयारी सुरू केल्याचीही चिन्ह दिसली. त्यामुळे ही जागा महायुतीत नेमकी कुणाला सुटते? मनसेचं इंजिन युतीत सामील होणार का? आणि सामील झालं तर दक्षिण मुंबईतून ठाकरे कुटुंबातील आणखी एक जण थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे येत्या काही दिवसात कळेल.

 

Web Title: lok sabha elections 2024 what are the chances for mns leader amit thackeray in south mumbai constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.