निकालानंतर मुंबई, ठाण्यात काय होणार..?
By अतुल कुलकर्णी | Published: June 3, 2024 09:50 AM2024-06-03T09:50:26+5:302024-06-03T09:51:00+5:30
lok sabha elections 2024 : राज्याच्या राजधानीत मुंबईत आणि ठाणे, कल्याण, पालघर या भागात अजित पवार गटाने स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची संधी घालवली.
- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आले. काहींना ते आवडले. काहींना ते सत्याला धरून नाहीत, असेही वाटले. या दोन्ही भूमिकांवर जालीम उपाय उद्याच सापडेल. उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. सरकार कोणाचे होणार हेही कळेल. निकालाचे खरे पडसाद राज्यासह मुंबई, ठाण्यात उमटतील. या निवडणुकीने महाराष्ट्रात चार पक्षांचे सहा पक्ष केले. राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. विधानसभेला या सहा पक्षांत मनसेदेखील सामील होईल. त्यामुळे सात पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील. एक्झिट पोलनुसार सगळ्यात मोठा फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसल्याचे दिसत आहे. जर हा निकाल प्रत्यक्षात तसाच आला आणि अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही, तर सगळ्यात पहिली उलथापालथ अजित पवार गटात होईल. त्यात जी फाटाफूट होईल त्याचा मुंबई, ठाण्यात फारसा परिणाम होणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघ वगळला तर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी उमेदवाराच उभे केले नव्हते.
राज्याच्या राजधानीत मुंबईत आणि ठाणे, कल्याण, पालघर या भागात अजित पवार गटाने स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची संधी घालवली. बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे निवडून आले तर भिवंडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला स्वतःचे स्थान निर्माण करता येईल. त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत घेता येईलच, असे मात्र नाही. लोकसभेची गणिते जशास तशी विधानसभेला लागू होतील, अशी कुठलीही चिन्हे सध्या तरी दिसत नाही. भाजपला काहीही करून ठाणे जिल्ह्यात स्वतःचे वर्चस्व निर्माण करायचे आहे. या जिल्ह्यात भाजपचे ११ आमदार आहेत. मात्र शिंदे गटाने ठाण्यातून नरेश मस्के आणि कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे यांना उभे केले. हे दोन्ही उमेदवार विजयी झाले तर भाजपला ठाण्यात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडा करावा लागेल. त्यासाठीची भांडणे विधानसभा निवडणुकीत दिसतील. भाजप आ. गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार केला. तरीही त्यांच्यावर भाजपने कसलीही कारवाई का केली नाही, त्याचे उत्तर या विधानसभा निवडणुकीत मिळेल.
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवार जाहीर करताना अनेक ठिकाणी पडती भूमिका घेतली. कारण त्यांना लोकसभेत महाराष्ट्रातून चांगले संख्याबळ हवे होते. मात्र कोणाला सोबत घेतल्यामुळे फायदा झाला आणि कोणामुळे नुकसान, हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट होईल आणि भाजपची भूमिका देखील..! ती भूमिका ‘एकला चलो रे’ अशी असली तर फारसे आश्चर्य वाटायचे कारण नाही. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेला किमान ८० ते ९० जागा हव्या आहेत, असे आधीच सांगून टाकले आहे. २८८ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत भाजपचे १०३ आमदार आहेत. शिवाय आम्ही भाजपसोबत आहोत असे सांगणाऱ्यांची संख्या जवळपास १२ आहे. या बारा जणांची भूमिका लोकसभेच्या निकालानंतर काय राहील हे जरी बाजूला ठेवले तरी भाजप महाराष्ट्रात किमान १६० ते १७५ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे उरलेल्या जागा शिंदे आणि अजित पवार गटाला घ्याव्या लागतील. त्याला हे दोन पक्ष तयार होतील का? याचे उत्तर लोकसभेच्या निकालात आहे.
भाजपचा सगळा भर मुंबई ३६, ठाणे १८, पालघर ६ अशा ६० जागांवर आहे. या तीन जिल्ह्यांतून विजयाची मुहूर्तमेढ रोवण्याची भाजपची भूमिका दिसते. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठीची खरी लढाई या तीन जिल्ह्यांतच होईल. शिंदे यांची शिवसेना आणि मनसे या दोघांना सोबत ठेवून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि थोड्या बहुत प्रमाणात काँग्रेससोबत कसे लढायचे, याची रणनीती आखायला सुरुवातही केली आहे. त्यात वेळप्रसंगी आपल्या सहयोगी पक्षाची मोजक्या जागांवर बोळवण करण्यातही भाजप मागेपुढे पाहणार नाही. शिंदे गटाला त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यावर स्वतःचे वर्चस्व कायम राखण्यासाठी मजबूत प्रयत्न करावे लागतील. लोकसभेला त्यांच्या दोन्ही जागा निवडून आल्या, तर त्यांच्या प्रयत्नांना या निकालामुळे मजबूत बळ मिळेल. तिथे भाजपची कोंडी होऊ शकते.
मुंबईत जर वर्षा गायकवाड निवडून आल्या तर भाई जगताप, सुरेश शेट्टी, नसीम खान, अमरजीत मनहास अशा अनेक नेत्यांना योग्य ते उत्तर मिळेल. यातील अनेक नेत्यांनी वर्षा गायकवाड यांचे निवडणुकीच्या काळात फोनही घेतले नाहीत, अशी तक्रार त्यांनी आधीच श्रेष्ठींकडे केली आहे. वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचाही मतदारसंघ आहे. तेथून गायकवाड यांना मताधिक्य मिळाले तर शेलार यांचीही कोंडी होईल. एक मात्र नक्की आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला मनासारखे यश मिळाले तर एक चित्र असेल. अपेक्षित यश मिळाले नाही, तर मात्र मुंबई, ठाणे, पालघर या भागात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन आणखी हातपाय पसरेल. मुंबईत यश मिळवायचे असेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेणे फायद्याचे ठरेल, याचा अनुभव काँग्रेसला लोकसभेत आला आहे. निकालातून या अनुभवावर शिक्कामोर्तब झाले तर मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना हे नवे समीकरण पाहायला मिळेल.
या सगळ्यात मनसेची भूमिका विधानसभेसाठी कळीची राहील. लोकसभेला एकही उमेदवार उभा न करता मनसेने विधानसभेसाठी जास्तीच्या जागा मागण्याचा स्वतःचा हक्क अबाधित ठेवला आहे. विधानसभेनंतर महापालिकेच्या निवडणुका होतील. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मिळून आठ महानगरपालिका आहेत. त्या महापालिका कोणाकडे, यासाठीची लढाई विधानसभेच्या निमित्ताने सुरू होईल आणि विधानसभेच्या निकालानंतर त्याचे उग्र स्वरूप पाहायला मिळेल.