मुंबई : लोकसभेची मुदत २६ मे २०२४ ला संपणार आहे. मात्र, आतापासूनच आगामी लोकसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई असे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मुंबई हे तीन लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. शिवसेना फुटीनंतर दक्षिण मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई हे शिंदे गटाकडे आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उपनेते आणि युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केली आहे. त्यामुळे विद्यमान खा. गजानन कीर्तिकर यांना पुन्हा येथून शिंदे गटाने तिकीट दिल्यास पिता-पुत्र अशी लढत होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीत मीच उमेदवार असेल असे काँग्रेसचे माजी खा. संजय निरुपम यांनी घोषित केले आहे. तर मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा वाढदिवस मनसैनिकांनी अंधेरी पूर्व येथे साजरा करताना भावी खासदार म्हणून त्यांचे बॅनर झळकवले होते.
दक्षिण मध्य मुंबईतून कोण? याचीच चर्चादक्षिण मध्य मुंबईचे विद्यमान खा. राहुल शेवाळे यांच्या विरोधात माजी महापौर विशाखा राऊत यांना उद्धव ठाकरे उमेदवारी देणार का, याची उत्सुकता आहे. तर दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, भाजपदेखील आपला उमेदवार म्हणून मंत्री मंगलप्रभात लोढा यांना तिकीट देईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उत्तर मुंबईतून ही नावे आघाडीवर...उत्तर मुंबईतून विद्यमान खा. गोपाळ शेट्टी यांची गेल्या ९ वर्षांतील खासदार म्हणून कामगिरी पाहता त्यांना परत लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि चारकोपचे आ. योगेश सागर यांच्या नावाचीसुद्धा चर्चा सुरू झाली आहे.
कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे लक्षउत्तर पूर्व मुंबई ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आहे. मात्र, शिवसेनेचे राज्यसभेचे खा. संजय राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा राऊत यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळेल, अशी कुजबुज सुरू आहे तर भाजपचे विद्यमान खा. मनोज कोटक यांना येथून परत उमेदवारी मिळेल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.