मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक २८ जानेवारीला जालना येथे होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही शेवटची प्रदेश कार्यसमिती बैठक असेल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे जालन्याचे खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी त्यांनी जालन्याची निवड केल्याचे म्हटले जाते. या बैठकीसाठी जालन्याबरोबरच अमरावतीचाही विचार करण्यात आला होता.भाजपा-शिवसेनेची लोकसभेसाठी युती होणार की नाही हे अद्यापदेखील निश्चित झालेले नाही. भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काय भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता असेल.भाजपा प्रदेश कार्यसमितीची बैठक नेहमी दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात येते; पण या वेळी मात्र, बैठकीचा एक दिवस कमी करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी प्रदेश कार्यकारिणीची बैठक होऊन या बैठकीमध्ये दुसऱ्या दिवशी मांडण्यात येणाºया ठरावांना अंतिम स्वरूप दिले जाते. मात्र या वेळी प्रदेश कार्यकारिणीची बैठक २८ जानेवारीला सकाळी आयोजित करण्यात आली आहे.खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने दंड थोपटले आहेत. अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालनामधून दानवेंना पराभूत करण्यासाठी स्वत: निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.राजकीयदृष्ट्या रावसाहेब दानवे यांना अडचणीत आणण्यासाठीची संधी भाजपाचे राज्यसभा सदस्य व पुण्याचे उद्योगपती संजय काकडे यांनीदेखील सोडलेली नाही. खासदार रावसाहेब दानवे हे जालन्यातून पराभूत झाले नाहीत, तर आपण राजकारण सोडू, असेही संजय काकडे यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीची व्यूहरचना दानवेंच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 5:52 AM