Join us

काय बोलणार? उमेदवार निरुत्तर; मतदार निघाले उत्तर भारतात, गाड्यांचे आरक्षण फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 6:52 AM

उत्तर भारत किंवा गुजरात, राजस्थानसह लगतच्या राज्यातील प्रत्येक नागरिकाचे मतदान मुंबईतच असेल असे नाही.

मुंबई : पश्चिम रेल्वेने उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आरक्षित आणि अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहेत. एप्रिलसह मे महिन्यांतील या रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे मुंबईतील मतदार गावी गेले तर त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर होईल आणि मतदानाची टक्केवारी घसरेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेने मंगळवारी चार उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या असून, यात वांद्रे टर्मिनस-बरौनी या गाडीचा समावेश आहे. यापूर्वीही वांद्रे टर्मिनस - सहरसा स्पेशल, मुंबई सेंट्रल - काठगोदाम, मुंबई सेंट्रल - कानपूर अनवरगंज, मुंबई सेंट्रल - कटिहार गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर या संख्येत भरच पडत आहे. उन्हाळी विशेषसह उर्वरित गाड्यांचे बुकिंगही फुल्ल झाले असून, ज्या प्रवाशांना आरक्षण मिळत नाही, अशा प्रवाशांसाठी अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

उत्तर भारत किंवा गुजरात, राजस्थानसह लगतच्या राज्यातील प्रत्येक नागरिकाचे मतदान मुंबईतच असेल असे नाही. बहुतांशी नागरिकांचे मतदान त्यांच्या राज्यात आहे. ज्या नागरिकांचे मतदान मुंबईत असेल असे नागरिक गावी गेले तर मतदानावर परिणाम होईल. - केतन शाह, सदस्य, झेडआरयूसीसी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून राज्यात आणि राज्याबाहेर उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या जात असून, याचा रेल्वे प्रवाशांना फायदा होत आहे. ऐन निवडणुकीत मुंबईकर मतदार सुट्टीसाठी गावी गेले तर याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.- यशवंत जडयार, रेल्वे प्रवासी संघटना

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४उत्तर प्रदेशमतदान