उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 10:49 AM2024-05-20T10:49:51+5:302024-05-20T10:52:09+5:30
ज्या विचारांमुळे आम्हाला राजकीय यश प्राप्त झालं होतं. त्या विचारांशी आम्ही एकनिष्ठ आहे. त्यामुळे राजकीय आव्हान वाटत नव्हते असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं.
मुंबई - जनतेचा कौल डावलून उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो चुकीचा होता हे मतदार मतदानातून दाखवून देतील असा विश्वास महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.
राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राहुल शेवाळे म्हणाले की, देशाचं भवितव्य कुणाच्या नेतृत्वात सुरक्षित राहील हे पाहून जनतेनं मतदान करावं. जास्तीत जास्त लोकांनी लोकशाहीतील त्यांचा हक्क बजावावा. या लोकशाही प्रक्रियेतील भागीदार आणि साक्षीदार व्हावे. तिसऱ्यांदा निवडून आल्यास मोडकळीस आलेल्या इमारती, धारावी प्रकल्प, गावठाणाचा विकास करून लोकांना मालकी हक्काची घरे देणार आहे. गेली २-३ महिने मेहनत घेतली आहे. जितकं जास्त मतदान होईल तेवढी लोकशाही बळकट होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच ही विचारांची लढाई आहे. आव्हानात्मक नाही. साडे चार लाख लोकांनी मागील वेळी मतदान करून मला विजयी केले होते. तेच मतदार आहेत. याच मतदारांचा अपमान करून उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत आघाडी केली होती. ते मतदारांना आवडलं नव्हते. त्यामुळे तेच मतदार मला मतदान करून उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय चुकीचा होता हे दाखवून देतील. ज्या विचारांमुळे आम्हाला राजकीय यश प्राप्त झालं होतं. त्या विचारांशी आम्ही एकनिष्ठ आहे. त्यामुळे राजकीय आव्हान वाटत नव्हते असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं.
दरम्यान, अतिशय चांगल्याप्रकारे मतदान होईल. इतके दिवस सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. राहुल शेवाळे नक्कीच तिसऱ्यांदा हॅटट्रिक करतील असा विश्वास राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी व्यक्त केला.