बीड लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक गतवर्षीपेक्षा अधिक लक्षवेधी ठरणार आहे. कारण, राज्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे बीड जिल्ह्यातही राजकीय समीकरणे बदलली आहेत. गतवर्षी एकमेकांविरुद्ध असलेले बहिण-भाऊ यंदाच्या निवडणुकीत एकत्र आहेत. त्यातच, भाजपाने प्रितम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, याची सर्वांनाच उत्सुकता होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला असून बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली आहे. सोनवणे यांनी गत २०१९ च्या निवडणुकीत प्रितम मुंडेंना चांगलीच फाईट दिली होती.
दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर झालेल्या २०१४ सालच्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांनी जवळपास ७ लाखाच्या विक्रमी मताधिक्याने काँग्रेसचे अशोकराव पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, गतनिवडणुकीत नवख्या बजरंग सोनवणेंना त्यांना चांगलंच आव्हान दिलं. त्यामुळे, १ लाख ६९ हजार ५७ मतांनी प्रितम मुंडे निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बजरंग सोनवणे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, त्यांचे मित्र धनंजय मुंडे हे यंदा त्यांच्याविरुद्ध प्रचाराच्या मैदानात असतील. तर, समोर प्रितम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंचं अव्हान आहे. त्यामुळे, बजरंग सोनवणे यांना ही निवडणूक सोपी नाही. मात्र, डोक्यावर शरद पवारांचा हात आणि भावनिक साद घेऊन बजरंग सोनवणे मैदानात उतरतील, असेच दिसून येते.
सोशल मीडियावर कडवी लढत वाटत असताना प्रीतम मुंडे यांनी जवळपास पावणेदोन लाखांच्या मताधिक्याने मिळवलेल्या विजयाने सर्वांचेच अंदाज फोल ठरले. मात्र, यंदा राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोमात असून बीड हेच त्याचे केंद्रस्थान मानले जाते. त्यामुळे, यंदाच्या बीडमधील लोकसभा निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यात, शरद पवार यांनी ज्योती मेटेंना तिकीट न देता बजरंग सोनवणेंना मैदानात उतरवले आहे.
केज, परळी, बीड, आष्टी, गेवराई आणि माजलगाव या सहा विधानसभा मतदारसंघातून बीडसाठी मतदान होते. त्यामुळे, यंदा प्रतिम मुंडें मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, की त्यांना महाविकास आघाडीचा धक्का बसेल, हे निवडणुकींनंतरच स्पष्ट होईल. मात्र, येथून वंचित बहुजन आघाडीचाही फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. वंचितने बीडमधून अद्याप उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे, पुढील काही दिवसांत तेही चित्र स्पष्ट होईल.
२०१९ साली असे झाले मतदान
दरम्यान, गत २०१९ च्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार १७५ मते तर बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९ हजार १०८ मते मिळाली. तर, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे ९१ हजार ९७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.