मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दरारा, दबदबा आणि रोखठोक स्वभाव पाहता त्यांची मुलाखत घेणं हे अजिबातच सोपं काम नाही. पण, हे आव्हान दोन हरहुन्नरी व्यक्तींनी स्वीकारलं आहे. अभिनेते म्हणून घराघरात पोहोचलेले आणि नंतर लोकसभा खासदार म्हणून लोकसभेपर्यंत मजल मारणारे, भारदस्त आवाज आणि भाषणाच्या ओघवत्या शैलीसाठी ओळखले जाणारे डॉ. अमोल कोल्हे आणि 'बँकर ते सिंगर' असा यशस्वी प्रवास करणाऱ्या, तसंच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या 'मिसेस होम मिनिस्टर' अमृता फडणवीस हे दोघं बेधडक राज ठाकरेंना देधडक प्रश्न विचारणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'चा भव्य सोहळा २६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये रंगणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांमधील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राज ठाकरे यांची महामुलाखत होणार असल्याचं जाहीर झालं होतं, पण ती कोण घेणार हे गुलदस्त्यात होतं. मात्र, डॉ. अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस हे दोघं राज ठाकरे यांचं अंतरंग उलगडून दाखवणार असल्याचं निश्चित झालं आहे. काही टोकदार, तर काही 'गुगली' प्रश्नांना राज कसे सामोरे जाणार आणि त्यातून कोणती 'राज की बात' उघड होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
लोकसेवा/समाजसेवा, प्रशासन, राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, क्रीडा या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा झेंडा देशातच नव्हे तर जगात फडकवणाऱ्या गुणवंतांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात येतं. या सोहळ्यातील अनेक मुलाखती 'सुपरहिट' ठरल्यात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गेल्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. त्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली होती. त्याआधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीसांची मुलाखत, रितेश देशमुखने घेतलेली देवेंद्र आणि अमृता फडणवीसांची मुलाखतही गाजली होती. त्यामुळे यावेळची राज ठाकरेंची महामुलाखतही एकदम हटके असेल.