लोकसभेला घरातूनच मतदान; चित्रीकरण होणार, नागरिकांना ‘१२-ड’ अर्ज घरोघरी जाऊन देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:55 AM2024-02-29T10:55:09+5:302024-02-29T10:56:23+5:30
नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत ८० पेक्षा जास्त वय असणारे, ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक दिव्यांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील ८० पेक्षा जास्त वयोगटातील २६ लाख ७० हजार, तर शारीरिक दिव्यांग पाच लाख ९० हजार ३८२ नागरिकांना या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८० पेक्षा जास्त वयोगटातील, ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक दिव्यांग नागरिकांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
१) मुंबई शहरात ८० वर्षांवरील मतदारांची संख्या पूर्वी १ लाख २६ हजार २० अशी होती.
२) ती यंदा कमी होऊन १ लाख ६ हजार इतकी झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीत नाव असणाऱ्या संबंधित नागरिकांना ‘१२-ड’ हा अर्ज घरोघरी जाऊन दिला जाणार आहे.
पारदर्शकता जपणार :
दरम्यान, घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आपले आहे.
मतदान वाया जाऊ नये म्हणून...
१) संबंधित मतदारांना अर्जात घरातून मतदान करणार किंवा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार, याबाबतची माहिती घेतली जाईल.
२) या अर्जांवर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील. या नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यास उर्वरित मतदारांना विशेषत: तरुणांना त्यातून प्रोत्साहन मिळेल.
३) मात्र, ज्या मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांचे मतदान वाया जाऊ नये, म्हणून ही सुविधा सुरू केल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.