बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 10:15 PM2021-06-04T22:15:06+5:302021-06-04T22:18:00+5:30
बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची बदली झाल्यानंतर हे पद अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आले होते.
मुंबई - केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या दांडगा अनुभव असलेले लोकेश चंद्रा यांची बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेस्टचे प्रभारी महाव्यवस्थापक अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्याकडून चंद्रा यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला.
बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची बदली झाल्यानंतर हे पद अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र १९९३ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी लोकेश चंद्रा यांची आता महाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी केंद्रीय पोलाद मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर काम केले आहे. तसेच केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. त्याचप्रमाणे नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.
चंद्र हे स्थापत्या अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून आयआयटी दिल्ली, एम.टेक ही पदवी देखिल त्यांनी संपादन केली आहे. बेस्ट उपक्रम १८८८ कोटींच्या आर्थिक संकटात आहे. त्याचबरोबर बस गाड्यांचा ताफा वाढवणे तूट कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, शहर भागातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे, अशा अनेक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागणार आहे.