लोकमान्यांचं होतं गिरणी कामगारांशी अतूट नातं 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:59 AM2023-04-13T10:59:30+5:302023-04-13T10:59:43+5:30

लोकमान्य टिळकांच्या आवाहनामुळे सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव व शिवजयंती सुरू झाले

lokmanya tilak had an unbreakable relationship with the mill workers | लोकमान्यांचं होतं गिरणी कामगारांशी अतूट नातं 

लोकमान्यांचं होतं गिरणी कामगारांशी अतूट नातं 

googlenewsNext

संजीव साबडे

लोकमान्य टिळकांच्या आवाहनामुळे सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव व शिवजयंती सुरू झाले, हेही अभ्यासात शिकविले जाते. ते तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून ओळखले जात. सत्यशोधक नेते महात्मा फुले आणि आद्य कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी टिळकांची कर्मठ मते मान्य नसतानाही कामगार आंदोलनाच्या वेळी त्यांना मदत केली होती, हे शिकविले गेलेले नाही; तसेच टिळक यांना जामीन मिळावा, यासाठी महात्मा फुले यांनी दहा हजार रुपयांची व्यवस्था केली होती, हे माहीत नसतं. 

हेच टिळक आणि मुंबईतील कामगार चळवळ यांचे नातेही विसरून चालणार नाही. लोकमान्य टिळक कामगारांचे, विशेषतः गिरणी कामगारांचेही नेते होते. मुंबईत त्यांनी गिरणी कामगारांच्या सभा घेतल्या होत्या. या कामगारांचे त्यांच्यावर कमालीचे प्रेम होते आणि त्यामुळेच ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड डांगे यांच्यावरही त्यांचा प्रभाव होता. रशियाचे तत्कालीन कम्युनिस्ट नेते व प्रमुख ब्लादिमीर लेनिन यांनी टिळकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची दखल घेतली होती. 

याच काळात हळूहळू कामगारांचं नेतृत्व त्यांच्याकडे येऊ लागलं.  आपल्या ‘मराठा’ दैनिकात प्रकाशित केलेल्या मजकुरामुळे त्यांना व आगरकर यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. त्यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवलं होतं. ते शिक्षा भोगून बाहेर आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक, प्रामुख्याने कामगार उभे होते. लोकमान्यांच्या स्वागतासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढाकार घेतला होता.  

कामगारांच्या अधिकारांसाठी टिळक कायम आग्रही होते. त्याचबरोबर कामगारांनी व्यसने सोडावीत, असे ते जाहीर सभांत सांगत. त्यांनी चिंचपोकळीच्या मैदानावर १९०८ साली कामगारांच्या तीन सभा घेतल्या. स्वदेशी व स्वातंत्र्याचं महत्त्व सांगतानाच त्यांनी कामगारांना मजबूत संघटना उभारण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी रेल्वे कामगारांनी संघटना स्थापन करावी, असाही लेख लिहिला होता. त्याच वर्षी म्हणजे १९०८ साली टिळकांवर एका लिखाणाबद्दल राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सुनाविण्यात आली. हे कळताच गिरणी कामगार संतापून रस्त्यावर उतरले. त्यांनी संप सुरू केला. आधी संपूर्ण गिरणगाव व नंतर मुंबईतील व्यवहार बंद झाले. 

या संपामुळे इतर कामगार, दुकानदार, फेरीवाले हेही बंदमध्ये सहभागी होते. रस्त्यांवर उतरलेल्या कामगारांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर केला. तरीही कामगार ऐकेनात, हे पाहून गोळीबार केला. त्यात सुमारे ५० कामगार मरण पावल्याचा उल्लेख आढळतो. तो संप व बंद सहा दिवसांनी मागे घेण्यात आला. 

स्वदेशीचे पुरस्कर्ते 
लोकमान्य टिळक स्वदेशीचे पुरस्कर्ते होते आणि रतनजी जमशेदजी टाटा, द्वारकाधीश धरमसी यांच्या सहकार्याने त्यांनी १९०६ मध्ये बॉम्बे स्वदेशी को-ऑपेरेटिव्ह स्टोअर सुरू केले. दादाभाई नौरोजी यांनी त्याचे उद्घाटन केले. जवाहरलाल नेहरू, गांधीजी, विजयालक्ष्मी पंडित यांनी त्यास भेट दिली होती. स्वदेशी चळवळ फोफावत गेली, लोक स्वदेशी कपडे वापरू लागले. त्यामुळे गिरणी कामगारांनी या कापडाचे दर वाढविले. त्यांनी दरवाढ मागे घ्यावी, यासाठी टिळक नियमित मुंबईत मालकांची भेट घेत.

Web Title: lokmanya tilak had an unbreakable relationship with the mill workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.