'लोकमत' अन् नेटीझन्स इम्पॅक्ट, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांचा आवाssज परतला रे...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 02:23 PM2019-01-17T14:23:30+5:302019-01-17T14:25:31+5:30
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपट पोस्टर रिलीजपासूनच चर्चेत आहे. पोस्टर्सनंतर टीझर, ट्रेलर आणि आता म्युझिक लाँचिंग सोहळ्यानंतरही बाळासाहेब आणि नवाजची चर्चा रंगली आहे.
मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चरित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मात्र, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सचिन खेडेकर यांचा आवाज स्पष्ट जाणवत होता. त्यामुळेच नेटीझन्सकडून हा आवाज बदलण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत Lokmat.com ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. लोकमतच्या या वृत्ताची आणि नेटीझन्सच्या प्रतिक्रियांची ठाकरे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दखल घेतली असून आता चित्रपटात बाळासाहेबांचाच आवाज ऐकायला मिळाला आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपट पोस्टर रिलीजपासूनच चर्चेत आहे. पोस्टर्सनंतर टीझर, ट्रेलर आणि आता म्युझिक लाँचिंग सोहळ्यानंतरही बाळासाहेब आणि नवाजची चर्चा रंगली आहे. नुकताच, या चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंगचा सोहळा पार पडला. त्यामध्ये एक मराठी गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. आपले साहेब ठाकरे.... असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीचे दोन संवाद ऐकू येतात. मात्र, मराठीतील या गाण्यात यावेळी नवाजचा तोंडून सचिन खेडेकरऐवजी चक्क बाळासाहेबांचाच आवाज ऐकू येत आहे. यावरुन, लोकमतने दिलेल्या वृत्ताची आणि सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या मागणीची दखल निर्माते-दिग्दर्शक यांनी घेतल्याचे दिसते. नेटीझन्स व माध्यमांच्या वृत्ताची दखल घेत, चित्रपटातील सचिन खेडेकर यांचा आवाज काढून टाकण्यात आला असून त्याऐवजी सुप्रसिद्ध मिमिक्री कलाकार चेतन शशितल यांनी बाळासाहेबांचा आवाज दिल्याचे समजते. त्यामुळे आता, 25 जानेवारीला थेअटरमध्ये चक्क बाळासाहेबांचाच आवाज ऐकायला मिळणार असल्याचं दिसतंय.
Exclusive: 'ठाकरे' सिनेमात होणार मोठा बदल; बाळासाहेबांना मिळणार बाळासाहेबांचाच 'आवाssज'!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या झंझावाताचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गेट-अपचं, त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होतंय. सगळे प्रसंग आणि डायलॉग सैनिकांच्या मनावर शहारा आणताहेत. पण, मराठी ट्रेलरमधील एक गोष्ट फारशी कुणालाच आवडलेली नाही; ती म्हणजे बाळासाहेबांसाठी वापरण्यात आलेला अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज. या नाराजीचे पडसाद सोशल मीडियावर उमटताहेत. बाळासाहेबांना बाळासाहेबांचाच आवाज असायला हवी, अशी तीव्र इच्छा नेटकरी व्यक्त करत होते.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा खर्जातला आवाज ऐकून अख्खं शिवाजी पार्क उसळायचं. कारण, त्या आवाजात जरब होती, दम होता, वेगळीच जादू होती. व्यंगचित्रकार बाळ ठाकरे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, या प्रवासात या आवाजाची भूमिका खूपच मोलाची ठरली होती. त्याच्याच जोरावर बाळासाहेबांनी भल्याभल्यांना हादरवलं होतं, मराठी माणसाला-हिंदूंना साभाळलं होतं, शिवसैनिकांना बळ दिलं होतं. विशेष म्हणजे, बाळासाहेबांच्या सभा आजच्या तरुणाईनं ऐकल्यात. त्यांचा आवाज महाराष्ट्रवासीयांच्या मनात आहे. म्हणूनच, 'ठाकरे'मध्ये बाळासाहेबांसाठी वापरलेला आवाज सगळ्यांनाच खटकला आणि त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली. 'लोकमत डॉट कॉम'ने सगळ्यात आधी या संदर्भातील बातमीही दिली होती. त्याचाच परिणाम म्हणून आता ठाकरे चित्रपटात बाळासाहेबांचा आवाज ऐकालया मिळेल, असे दिसते.
'25 वर्षे झाली हो... पण अजूनही तोच लढा सुरूय. 80 टक्के मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न हाच....'
गाण्यातील हे संवाद सेम टू सेम बाळासाहेबांच्याच आवाजात असल्याचे जाणवते.