मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात जो-तो ‘टार्गेट’च्या मागे पळतोय. स्वप्नं जितकी मोठी, तितकंच हे टार्गेट मोठं. मग, हा पाठलाग करताना अनेकजण अडखळतात, धडपडतात, थकून जातात. पण म्हणून थांबून चालत नाही. आज थकलो, तरी उद्या नवं बळ घेऊन बाहेर पडून भरारी घेण्यासाठी पंख पसरावेच लागतात. या भरारीसाठी तरुणाईच्या मनात नवी उमेद जागवावी, त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं लोकमत आजपासून घेऊन येतोय, ‘लोकमत भक्ती’ हा नवा यू-ट्यूब चॅनल!
कीर्तन, प्रवचन, अभंगांच्या माध्यमातून अनेक संतांनी समाजप्रबोधन केलं. लोकांना जगण्याचा मंत्र दिला, तंत्र शिकवलं. आजच्या काळातही संतपरंपरेचा हा वारसा जपत, अनेक ज्ञानी व्यक्ती जागृतीचं काम करत आहेत. सुख, शांती आणि सद्भावनेची शिकवण देत आहेत. खास करून, पैसा आणि भौतिक सुखांच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीला त्यांच्या विचारांची गरज आहे. हे ओळखूनच आज गुरूपदाला पोहोचलेल्या व्यक्तींची प्रवचनं, कीर्तनं, अभंग तरुणाईला त्यांच्या हक्काच्या व्यासपीठावर - अर्थात डिजिटल माध्यमावर मिळावीत, असा प्रयत्न ‘लोकमत भक्ती’ या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. सद्गुरू वामनराव पै, प्रल्हाद पै, सद्गुरू जग्गी वासुदेव, सत्यपाल महाराज यांची कीर्तनं, प्रवचनं, व्याख्यानं, अभंगांचे व्हिडीओ ‘लोकमत भक्ती’ या चॅनलवर आपल्याला पाहता येतील. मन शांत कसं ठेवावं, मन:शक्ती जागृत केल्यानं असाध्यही कसं साध्य होऊ शकतं, धर्म, शास्त्र नेमकं काय सांगतं, वेद-पुराणांमधील गोष्टी आजच्या काळात कशा आचरणात आणता येतील, संतांची शिकवण अडचणीतून कसा मार्ग दाखवू शकते, या विषयांवरील निरुपणं ‘लोकमत भक्ती’वर पाहता येतील. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेलं इन्स्पीरेशन, मोटिव्हेशन या चॅनलवरून तुम्हाला नक्की मिळेल. तेव्हा, आजच ‘लोकमत भक्ती’ सबस्क्राईब करायला विसरू नका!