लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जात, पंथ, धर्म, पक्ष, हुद्दा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या रुग्णांशी रक्ताचं नातं जोडण्याकरिता गेली पंधरा दिवस महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस झटत होता. प्रत्येकाची मनापासून घेतलेली मेहनत कामी आली, आणि महाराष्ट्रात ५० हजार लोकांनी रक्तदान करत आगळावेगळा विक्रम निर्माण केला. या मोहिमेत सहभागी असणारे आणि रक्ताचं नातं जोडण्याकरिता धडपड करणारे प्रत्येक जण यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. संकटकाळी धावून जाण्याची महाराष्ट्राची परंपरा, या मोहिमेने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे.
लोकमतची मातृसंस्था नागपुर लोकमत ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने आणि लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन जुलै रोजी या मोहिमेची सुरुवात झाली. राज्याचा सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, राज्य रक्त संक्रमण परिषद तसेच विविध संघटना यात सहभागी झाल्या आहेत. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असताना लोकमत समूहाने ही मोहिम हाती घेतली.
रविवार दिनांक १८ जुलै रोजी देखील रक्तदान मोहीम सुरू राहणार आहे. आयएएस, आयपीएस तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी, महिलांनी या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत लोक या मोहिमेत रक्तदान करण्यासाठी हिरीरीने पुढे येत आहेत.
सलग १५ दिवस रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद
- ज्या दिवशी रक्तदान मोहीम सुरू झाली त्या दिवशी म्हणजे एक जुलै रोजी महाराष्ट्रात फक्त १९ हजार युनिट रक्त शिल्लक होते.
- मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ५ हजार लोकांनी रक्तदान करून संकट काळात आम्ही महाराष्ट्रासाठी धावून येतो हे दाखवून दिले.
- लोकमतवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी ही मोहीम स्वतःची मोहीम बनवली, आणि अवघ्या १५ दिवसात ५० हजाराचे लक्ष या मोहिमेने पार पाडले.