मुंबई – २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला. राज्यात गेल्या २ वर्षापासून महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र हे सरकार अंतर्गत वादातून कोसळेल असा दावा भाजपाकडून वारंवार केला जातो. परंतु अद्याप भाजपा नेत्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे.
लोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर अवॉर्ड सोहळ्यात संजय राऊत यांना राज्यात महाविकास आघाडी सरकार जर कोसळलं तर शिवसेनेसमोर कोणता पर्याय असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. या पर्यायात शिवसेना-राष्ट्रवादी, शिवसेना-काँग्रेस की शिवसेना-मनसे असे ३ पर्याय देण्यात आले. तेव्हा राऊतांनी सांगितलं की, सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. ही अवस्था बदलणार नाही. आमचा संसार बरा चालला आहे. संसार मोडू नये या मताचा मी आहे. आधी दोघांच्या संसारात रोज खडखडाट व्हायचं आता तिघांचा संसार उत्तम चाललं आहे. कुणाचीही दृष्ट लागू नये असं म्हणत राऊतांनी भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला. भाडीपा फेम सारंग साठये यांनी संजय राऊतांची मुलाखत घेतली.
ममता बॅनर्जी बंगालच्या वाघिण
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याबाबत संजय राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जी या बंगालच्या वाघिणी आहेत. त्यांचे प्रयत्न खूप चांगले चालले आहेत. महाराष्ट्र वाघांचा आहे. त्यामुळे आगामी काळात वाघ-वाघिणीचं पुढे काय होतं बघू असं सांगत आगामी राजकारणाचे संकेत दिले.
वारं फिरवण्याची ताकद तुमच्या वाणीत हवी
वारं फिरत नाही. वारं फिरवण्याची ताकद तुमच्या वाणीत असायला हवी. याबद्दल क्रिकेट कॉमेन्टेंटर हर्षा भोगले चांगलं सांगू शकतात. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या काळात माझ्या ट्विटनं वारं फिरायचं असं संजय राऊत यांनी सांगितले.
जिथं जिथं मराठीचा आवाज तिथं लोकमत
तुम्ही मराठी माणसांचा आवाज आहात. ऋषी दर्डा यांचं फार कौतुक वाटतं. हा असा कार्यक्रम आहे त्यात तरुणांसोबत बसायला आवडलं. जिथं जिथं मराठीचा आवाज आहे तिथं लोकमत आहे. दुसऱ्या वृत्तपत्राच्या संपादकाला बोलवणं हे मोठं मन असलेला माणूस असं करतो अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकमतचे समुहाचे संपादक राजेंद्र दर्डा आणि एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचं कौतुक केले.