शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं. तसंच आज ते आमच्या सर्वच गोष्टींवर दावा करत असल्याचं म्हणत निशाणा साधला. मुंबईत लोकमत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड'मध्ये आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
“महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी मी त्यावेळी दावोसला गेलो होतो. माझ्या वडिलांनी एकनाथ शिंदे यांना बोलावलं होतं. माझ्या वडिलांच्या दोन सर्जरी झाल्या होत्या तेव्हा आम्ही ज्यांना आता गद्दार म्हणतो त्यांच्या मनात काही गोष्टी सुरू होत्या. पक्षातून फुटलो, मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे का? असे विचार चालले होते. त्यांच्यावर मोठा दबावही होता. गावातही गेलो तरी लोक सांगतील की कोणते दबाव आपल्या देशात बनतात. त्यांना २० मे ला विचारलं होतं तुमच्या मनात काय आहे. तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का विचारलं होतं. ही बंडखोरी नाही. हे झालंय ती गद्दारी आहे. पाठीत सुरा खुपसलाय. ज्यांनी स्वत:ला विकलं आहे त्यांना थांबवून काय करणार. ज्यांनी आपला आत्मा विकला आहे, त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत," असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.
अजित पवारांवरही भाष्यशिवसेनेचे आमदार म्हणायचे की, अजित पवार फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांनाच फंड देतात? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात, 'अजित पवारांनी सेशनमध्येच फंड दिल्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला होता. आमदारांना आमच्या काळात खूप फंड दिला. आता त्यांना विचारा, आता फंड नाही, आवाजही दाबला जातोय. हे सगळे आज ना उद्या निलंबित होणार. मी त्यांना आव्हान देतोय, राजीनामा द्या आणि निवडणूक लढा, जनता निर्णय घेईल. मी मुख्यमंत्र्यांनाही आव्हान दिलंय, वरळीतून लढा किंवा मी तुमच्या ठाण्यातून लढतो. पण, निवडणूक घेण्याची यांच्यात हिम्मत नाही,' अशी टीकाही आदित्य यांनी केली.
उद्धव-राज, आदित्य-अमित एकत्र येणार का?एकूणच राजकीय परिस्थिती पाहता लोकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव-राज, आदित्य-अमित एकत्र येणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी प्रत्येक दिवशी धोरणांवर बोलत असतो. जे योग्य आणि अयोग्य आहे, त्यावर चर्चा करतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चा या वैयक्तिक आहेत. कोणाशी युती झाली पाहिजे किंवा नाही, हे वैयक्तिक आहे. आज देशातील परिस्थिती पाहता स्वतःला महत्त्व देताना लोक दिसत आहेत. स्वतःच्या पलीकडे अनेक विषय आहेत, जे लोकांसाठी महत्त्वाचे आहेत. आज लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत, त्या युती होण्यापेक्षा किंवा २० ते ५० वर्षांपूर्वी काय झाले, त्यावर चर्चा करून भांडतोय. भविष्यासाठी कुणीही चर्चा करत नाही, असं सांगत या प्रश्नाला बगल दिली.