शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं. तसंच आज ते आमच्या सर्वच गोष्टींवर दावा करत असल्याचं म्हणत निशाणा साधला. मुंबईत लोकमत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड'मध्ये आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
“आमच्या पक्षाचं, आमच्या कुटुंबाचं एकाद वेळी बाजूला ठेवा. पण आज राज्यात असंवैधानिक सरकार बसलं आहे, ९ महिन्यांपासून कोणतेही निर्णय घेतले जात आहे. घोटाळ्यांवर घोटाळे बाहेर येत आहेत. ते सर्वच गोष्टींवर दावा करतायत. नाव घ्या, कुटुंबाचं घ्या, आजोबांचं नाव चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीचे या कठिण दिवसातून जात आहोत. केवळ महाराष्ट्रातच नाही. तुम्ही कधीही सांगा आम्हाला हे आवडलं नाही, ते सेन्सॉर केलं जातं, ट्रोल केलं जातं, तुमच्या विरोधात पोलीस केसेस होतात. अशा गोष्टी लोकशाहीसाठी घातक आहेत. माध्यमांचं स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. आपल्या देशात अघोषित हुकुमशाही सुरू आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
"माझ्या वडिलांच्या दोन सर्जरी झाल्या होत्या तेव्हा आम्ही ज्यांना आता गद्दार म्हणतो त्यांच्या मनात काही गोष्टी सुरू होत्या. पक्षातून फुटल्यावर मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे का? असे विचार चालले होते. त्यांच्यावर मोठा दबावही होता. त्यांना २० मे ला विचारलं होतं तुमच्या मनात काय आहे. हे झालंय ती गद्दारी आहे. पाठीत सुरा खुपसलाय. ज्यांनी आपला आत्मा विकला आहे, त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत," असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.