रचित हिराणी याचे नाव तुम्ही ऐकले असेल, त्याला तुम्ही पाहिलेही असेल. आठवतेय का? अहो तोच... मोटरऑक्टेन या युट्यूब चॅनलवर तुम्हा आम्हा सर्वांना हिंदीतून गाड्यांची माहिती देतो. या रचित हिराणीला आज लोकमतने बेस्ट ऑटोमोबाईल इन्फ्लुअन्सर पुरस्काराने (Rachit Hirani - Best Automobile Influencer) गौरविले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने लोकमत DIA (डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड) देऊन गुरूवारी गौरव करण्यात आला. कोट्यवधी लाईक्स, लाखो कॉमेंटस आणि संपूर्ण जगातून व्ह्यू मिळविणारे हे सोशल मीडियातील मिलेनिअर्सच प्रथमच एका व्यासपीठावर आले होते.
रचित हिराणी हा कोणालाही नवखा नाहीय. रचित हा ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे. त्याने त्याचे करिअर कारवाले या वेबसाईट, वेब चॅनेलमध्ये ऑटो जर्नालिस्ट म्हणून सुरु केले होते. कारवालेनंतर ऑटोबिल्ड, कारदेखो, कार ट्रेड आणि यानंतर स्वत:चा युट्यूब चॅनेल आणि वेसबाईट असा याचा प्रवास आहे.
आज युट्यूबवर तुम्हाला मराठीतून ऑटोविश्वाची माहिती देणारे फार कमी किंवा जास्त माहिती नसलेले चॅनेल आहेत. परंतू, या रचितने हिंदीतील पहिला ऑटोमोबाईलशी संबंधीत युट्यूब चॅनेल सुरु केला. आज या मोटरऑक्टेन (MotorOctane) चॅनलचे 2.37 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. नवनवीन कार, त्यांचे फिचर्स आदींची माहिती रचित हिंदीतून देत असल्याने देशभरात हा चॅनेल फार कमी वेळात लोकप्रिय झाला. आज रचितने मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, पोर्श, ड्युकाटी सारख्या कंपन्यांसह मारुती, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा सारख्या कंपन्यांच्या कारचे हजाराच्या वर रिव्ह्यू केलेले आहेत. यामुळे तुम्हा, आम्हाला ती कार कशी आहे, परफॉर्मन्स कसा आहे, काय काय फिचर्स आहेत याची माहिती मिळते.
खरेतर त्याला कन्सल्टन्सी सुरु करायची होती. मोटरऑक्टेन हे नावदेखील डोक्यात होते. परंतू सुरुवात कशी करावी याबाबत सुचत नव्हते. आधी वेबसाईट सुरु केली, नंतर पसारा वाढत गेला आणि युट्यूब चॅनेल सुरु केल्याचे तो म्हणाला.