मुंबई – सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांची मनं जिंकणाऱ्या सुपरस्टारचा लोकमत समुहाकडून डिजीटल इन्फ्लूअन्सर या पुरस्कारानं गौरव करण्यात आला. गुरुवारी मुंबईच्या सहार स्टार हॉटेलमध्ये हा रंगतदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला सोशल मीडियातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला शिवसेना खासदार संजय राऊत, क्रिकेट कॉमेन्टेटर हर्षा भोगले, प्रसिद्ध गायक महेश काळे, अभिनेत्री प्रिया बापट, जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्यासह सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सवरून घराघरात पोहोचलेले तरुण-तडफदार सेलिब्रिटी उपस्थित होते.
बिग बॉस मराठी - २ चा उपविजेता अभिनेता शिव ठाकरे याला लोकमतच्या सोहळ्यात बेस्ट जोश मराठी सुपरस्टार (मेल) या पुरस्कारानं गौरवण्यात आलं, तर अभिनेत्री अभिज्ञा भावे जोश महिला सुपरस्टार (फिमेल) या पुरस्काराची मानकरी ठरली. शिव ठाकरे जेव्हा पुरस्कार घेण्यासाठी आला, तेव्हा सूत्रसंचालन करणारा सिद्धार्थ कनन याने त्याला डान्स करण्याची विनंती केली. तेव्हा शिव ठाकरे यांच्यासह मंचावर अनेक सेलिब्रिटी आणि अभिनेत्री मिताली मयेकरने आपल्या नृत्याचा जलवा दाखवला. आदित्य अडगावकर आणि ॲड. सायली वलामे या दोघांना बेस्ट जोश मराठी सुपरस्टार इन्फ्लूअन्सर म्हणून गौरवण्यात आलं.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमशान केलं, जे नेटिझन्सचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड झाले आणि घराघरात-मनामनात पोहोचले, अशा अवलियांचा गौरव करण्यात आला. त्यात फोक्सड इंडियनचा करण सोनावणे (बेस्ट डिजिटल क्रिएटर), जस्ट नील थिंग्सचा नील साळेकर (बेस्ट कॉमिक इन्फ्लूअन्सर), सौरभ घाडगे (बेस्ट व्हिडीओ क्रिएटर), यशराज मुखाते (बेस्ट व्हायरल कंटेन्ट क्रिएटर), आवेझ दरबार (बेस्ट एन्टरटेन्मेंट इन्फ्लूअन्सर), संग्राम चौगुले (बेस्ट फिटनेस इन्फ्लूअन्सर), रचित हिरानी (बेस्ट ऑटोमोबाईल इन्फ्लूअन्सर), जन्नत झुबैर (बेस्ट एन्टरटन्मेंट इन्फ्लूअन्सर), मिस मालिनी (बेस्ट सेलिब्रिटी अँड लाईफस्टाईल इन्फ्लूअन्सर), नगमा मिरजकर (बेस्ट डान्स इन्फ्लूअन्सर), छोटू दादा (बेस्ट कॉमिक इन्फ्लूअन्सर), वैभव घुगे (बेस्ट कोरिओग्राफी इन्फ्लूअन्सर) आदींना सन्मानित करण्यात आलं.
रॅम्पवॉक ठरला लक्षवेधी
लोकमत समुहाकडून बेस्ट सेलिब्रिटी इन्फ्लूअन्सर पुरस्कारासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिचा सन्मान करण्यात आला. त्याचसोबत बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लूअन्सर म्हणून कॉमेन्टेटर हर्षा भोगले यांना गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमात मंचावर सूत्रसंचालक सिद्धार्थ कनन याने सेलिब्रिटींना रॅम्पवॉक करण्यास सांगितले. तेव्हा प्रिया बापट, यशराज मुखाते या दोघांचा रॅम्पवॉक लक्षवेधी ठरला. तर बेस्ट इन्टरटेन्मेंट इन्फ्लूअन्सर फिमेल जन्नत झुबीर हिच्या डान्सनं सगळ्यांना घायाळ केलं.
संजय राऊतांची हटके मुलाखत
भाडिपा फेम सारंग साठये याने शिवसेना नेते संजय राऊत यांची हटके मुलाखत घेतली. यावेळी राऊतांनी भाजपाची फिरकी घेत मी भाडिपा सारखं पाहतो अन् भाजपाकडे फक्त पाहतो असा टोला लगावला. लोकमतला नवीन माध्यमातून ऋषी दर्डा यांनी समुहाला पुढे घेऊन गेला त्याचे कौतुक वाटते. जिथं जिथं मराठीचा आवाज आहे तिथे लोकमत आहे अशा शब्दात राऊतांनी कौतुक केले.
या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, मी रोज सकाळी मीडियाशी बोलतो जे बोलायचं ते येत नाही. जे व्हायरल होतं ते कुठूनतरी काढलं जातं. नाचलं कोण यावर व्हिडीओ व्हायरल होतो. आम्ही ठरवून नाचतो. आधी स्टेप ठरवतो मग पाऊलं टाकतो. दिसताना उत्स्फुर्त वाटतो. महाराष्ट्रात जो प्रयोग झाला तोदेखील एक नाचच आहे असं त्यांनी सांगितले.
आहे परी तर डोन्ट वरी!
छोटा पॅकेट बडा धमाका म्हणतात तसं सोशल मीडियावर तिच्या क्यूटनेसनं अनेकांना घायाळ केले, अशी सर्वांची लाडकी परी मायरा वायकुळ हिला लोकमत समुहाकडून बेस्ट किड्स इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं गौरवण्यात आले. छोट्या मायराला सूत्रसंचालक सिद्धार्थ कनन हा पुरस्कार जिंकून कसं वाटतंय? असा विचारलं असता तिनं खूप मज्जा वाटते. यावेळी आई वडिलांना काय सांगशील? असं विचारताच परी थोडी विचार करत I Love You असं प्रेमळ उत्तर दिलं.
आवेझ दरबार आणि नगमा मिरजकर यांचा रॉमेन्टिक डान्स
डिजीटल प्लॅटफॉर्मवर स्वत:च्या डान्सची जादू चालवणाऱ्या आवेझ दरबारला लोकमत समुहाने बेस्ट इन्टरटेन्मेंट इन्फ्लूअन्सर अवॉर्डनं गौरवण्यात आले. तेव्हा आवेझ म्हणाला की, या पुरस्काराबद्दल मी लोकमतचे आभार मानतो. जेव्हा मी व्हिडीओ कन्टेंट बनवण्यास सुरुवात केली अनेक मित्रांनी खिल्ली उडवली, माझ्या कुटुंबानेही मला विरोध केला. परंतु मी माझा प्रवास सुरु केला. त्यानंतर जे यश मिळालं तेव्हा माझे बाबा बाहेर जायचे तेव्हा माझ्याबद्दल त्यांना विचारायचे. तेव्हा वडिलांनी माझ्या कामाचं कौतुक केले तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता अशी भावूक प्रतिक्रिया त्याने दिली. तर बेस्ट डान्स इन्फ्लूअन्सर म्हणून नगमा मिरजकर हिचा गौरव करण्यात आला. यावेळी नगमा आणि आवेझच्या रॉमेन्टिक डान्सनं सगळ्यांची वाहवा मिळवली. यावेळी मी जो काही डान्स करते, जे शिकलेय ते आवेझकडून शिकल्याचं म्हटलं.
अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय मला लागतंच
बेस्ट सेलिब्रिटी इन्फ्लूअन्सर अभिनेत्री प्रिया बापट हिला पुरस्कार दिल्यानंतर मंचावर गंमतीशीर किस्सा घडला. प्रिया बापट हिच्या अभिनयाची भूरळ सगळ्यांनाच आहे. यावेळी पुरस्कार दिल्यानंतर प्रियानं मनोगत व्यक्त केलं. जेव्हा तुमच्या कामाचं कौतुक केले जाते तेव्हा खूप भारी वाटतं. लोकमतनं मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी आभारी आहे. त्यात डिजीटल क्षेत्रातला हा अवॉर्ड असल्यामुळे एक मराठीतलं वाक्य आजच्या दिवसासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे अन्न, वस्त्र निवारा आणि वायफाय मला लागतंच असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
...अन् ऑरेंज झ्युस गँग मंचावर आली
लोकमत समुहाकडून बेस्ट डिजीटल क्रिएटर इन्फ्लूअन्सर करण सोनावणेचा गौरव करण्यात आला. तेव्हा ऑरेंज झ्युस गँगमुळं हा पुरस्कार मिळाल्याचं करणने सांगितले. तेव्हा सूत्रसंचालक सिद्धार्थनं ऑरेंज झ्युस गँगला मंचावर बोलावलं आणि डिझेच्या तालावर या मंडळीने स्टेजवर डान्स केला.