मुंबई : मराठी दिवाळी अंकांच्या परंपरेत वेगळा ठसा उमटविणाऱ्या आणि गेल्यावर्षी तब्बल तीन लाख प्रतींच्या विक्रमी विक्रीचे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) प्रमाणपत्र मिळवणारा ‘लोकमत’ वृत्तसमुहाचा बहुचर्चित दिवाळी अंक ‘दीपोत्सव’ याहीवर्षी ‘न्यू नॉर्मल’ जगाचा आरसा होऊन दाखल झाला आहे.
‘दीपोत्सव’ या मराठी आणि ‘दीपभव’ या हिंदी - अशा दोन वैशिष्टयपूर्ण दिवाळी अंकांचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत राजभवनच्या जलविहार सभागृहात संपन्न झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील प्रमुख पाहुणे होते. लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा तसेच ‘दीपोत्सव’च्या संपादक अपर्णा वेलणकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या वाचनसंस्कृतीत दिवाळीचा अमूल्य ठेवा म्हणजे दीपोत्सव. दिवाळी येण्याची वाट ज्या कारणांसाठी मी आतुरतेने पाहतो त्यात दीपोत्सव एक आहे, असे स्वत: एक समृद्ध वाचक असलेले बाळासाहेब थोरात यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मान्यवरांच्या वतीने प्रातिनिधिक प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘दिवाळी ज्या कारणांसाठी हवीहवीशी वाटते त्यात आता दीपोत्सव प्रमुख आहे. दिवाळीचा फराळ काही दिवसच असतो पण दीपोत्सवची पर्वणी मात्र अनेक दिवस अनुभवता येते!’
‘दीपोत्सव’ आणि ‘दीपभव’ हे दोन्ही अंक विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध आहेत. आता आशेने आणि उमेदीने नवे पान उलटू या. झाले गेले सगळे मागे सारून उत्साहाची एक पणती आपल्या अंगणात लावू या! या दिव्यांबरोबरच सर्वांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश येऊ दे...आणि ‘दीपोत्सव’च्या स्वागतात कसलीच उणीव नसू दे!!