Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण मुद्द्यावरून मराठा समाज दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरे करत असून, ते सध्या मुंबईत आहेत. आम्ही जात बदललेली नाही. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची रोखठोक मुलाखत घेतली. यावेळी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याची जी मागणी केली जात आहे. त्यावर मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही पूर्वीपासून ओबीसी आहोत. आम्ही जात बदललेली नाही. आम्ही शेतकरी आहोत. आता फक्त शब्द सुधारला आहे. पूर्वी कुणबी म्हटले जात होते. आता शेती शब्द आला आहे. आम्ही कुणबी शेतकरी आहोत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, असे आम्हीही म्हणत आहोत, कारण धक्का लागतच नाही. पूर्वीपासूनच मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. आमच्या बाकीच्या बांधवांना शेती करतो म्हणून कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे, तर आम्ही कोण आहोत. आम्ही दरवाजात उभे आहोत, आम्हाला फक्त आत येऊ द्या, अशी आमची मागणी आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
५ हजार पानी पुरावा आहे आणि काय हवे?
मराठा आरक्षणासाठी ५ हजार पानी पुरावा आहे. एकाद्या पानाचा पुरावा असेल तरी तो आधार म्हणून ग्राह्य धरला जातो. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने एक महिन्याची मुदत द्या, असे म्हटले होते. त्यानुसार, ती देण्यात आली आहे. हजारो पानी पुरावा असेल तर त्याआधारे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा. तुम्हाला आमच्यासाठी पुरावे लागतात. तुम्ही बाकीच्या जाती ओबीसी आरक्षणात घेतल्या आहेत, त्यासाठी नेमका काय पुरावा दिलाय, याची माहिती सरकार आम्हाला देईल का, १९६७ मध्ये ओबीसींना आरक्षण देताना नेमका कशाचा आधार घेतला, हे सांगतील का आम्हाला, बाकीच्या पोटजाती जशा ओबीसीमध्ये घातल्या तसे मराठ्यांची कुणबी पोटजात होती. आमच्यावरच हा अन्याय कशासाठी, असा सवाल मनोज जरांगे यांनी लोकमतच्या मुलाखतीदरम्यान केला.
दरम्यान, माळी समाजाच्या व्यवसायात आणि मराठ्यांमध्ये नेमका बदल काय आहे, शेती व्यवसायाचा आधार घेऊन जर जाती निर्माण केल्यात, तर आमचे बंधूही कुणबी आहेत. आमचाही व्यवसाय शेती आहे. हा फरक का, अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.