मनोहर कुंभेजकर
मुंबई - आरे येथील पालिकेच्या शाळेतील 60 शिक्षक व कर्मचाऱ्यांचे फेंब्रुवारी महिन्यातील वेतन लवकरच मिळणार आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत पालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.
आरेच्या जंगलात इंटेरनेटची सुविधा पोहचत नसल्याने येथील 60 शिक्षक आणि कर्मचारी यांची बायोमेट्रिक हजेरीची नोंदणी होत नसल्याने त्यांचे वेतन फेब्रुवारी 2019 पासून रखडलेले आहे. फेब्रुवारी महिन्यांचे वेतन रखडल्याचे वृत्त सोमवारी लोकमत ऑनलाईन व कालच्या लोकमतच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. लोकमतच्या वृतांची वॉच डॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे विश्वस्त ग्रोडफे पिमेटा यांनी दखल घेतली. लोकमतच्या वृत्ताचा हवाला देत पालिका आयुक्तांच्या टेबलावर वेतन मंजुरीची फाईल पेंडिंग असल्याने येथील शिक्षकांचे वेतन रखडल्याचे त्यांनी आयुक्तांना तातडीने इमेल करून निदर्शनास आणले. त्यानंतर, आयुक्तांनी तात्काळ याची दखल घेत पालिका शिक्षण अधिकारी यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले.लोकमतच्या वृत्ताचा दणक्याने आता तरी येथील 60 शिक्षकांना फेब्रुवारी पासून प्रलंबित असलेले वेतन लवकर मिळेल, असा विश्वास पिमेटा यांनी व्यक्त केला.