लोकमत इम्पॅक्ट : दिंडोशीच्या रॉयल हिल्स सहकारी सोसायटीत मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद
By मनोहर कुंभेजकर | Published: March 14, 2023 11:11 AM2023-03-14T11:11:17+5:302023-03-14T11:11:53+5:30
वनखात्याची धाडसी कामगिरी
मुंबई-संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी न्यू दिंडोशीत गोरेगाव (पूर्व) म्हाडाच्या रॉयल हिल्स सहकारी सोसायटीच्या ७७ बंगल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या आज पहाटे वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. सकाळी ९.१५ च्या सुमारास बिबट्याला घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी वनखात्याची रेस्क्यू टीम घेऊन गेली.
वनखात्याचे डीसीएफ संतोष सत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली एसीएफ गिरीजा देसाई, आरएफओ राकेश भोईर,राउंड ऑफिसर रोशन शिंदे,राऊंड ऑफिसर रेस्क्यू टीमचे रवींद्र तिवर यांनी गेली ३-४ दिवस रात्रीची गस्त घालत आज अखेर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद केले. काल मध्यरात्री रॉयल हिल्स सहकारी सोसायटीच्या आवारात येतांना बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असावा, मात्र आम्हाला सकाळी ७ वाजता बिबट्या पिंजऱ्यात सापडल्याची माहिती मिळाली असल्याचं रोहन शिंदे व रवींद्र तिवर यांनी लोकमतला सांगितलं. त्याआधी रॉयल हिल्स सहकारी सोसायटीचे सचिव अजित जठार यांनी लोकमतला बिबट्या घेवून जातानांचे व्हिडीओ आणि माहिती लोकमतला दिली.
न्यू दिंडोशीच्या रॉयल हिल्स सहकारी संस्थेत बिबट्या मुक्त संचार करत दि,७ व दि,८ रोजी सलग दोन दिवस मध्यरात्री या गच्चीवरून त्या गच्चीवर बिबट्याच्या उड्या मारत असल्याने येथील ५०० नागरिक भयभीत झाले होते. विशेष म्हणजे
भक्ष्य शोधण्यासाठी दि,७ आणि दि,८ मार्चला सलग दोन दिवस बिबट्या मध्यरात्री येथील बंगल्याच्या या गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर उड्या मारत मुक्त संचार करत असल्याने आमची रात्रीची झोपच उडाली होती. येथे बिबट्या सोसायटी च्या आवारात फ्लड लाईट्स असून सुद्धा येतो एवढी बिबट्याची डेरिंग होती अशी माहिती रॉयल हिल्स सहकारी संस्थेचे अध्यक्ष दीपक दिवटे आणि सचिव अजित जठार यांनी लोकमतला दिली होती.
लोकमत ऑनलाईनने सर्वप्रथम सकाळी माहिती मिळताच शुक्रवार दि,१० रोजी दिलेली बातमी आणि लगेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिंडोशीचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभू यांनी विधानसभेत आमचा आक्रमक पणे प्रश्न मांडला. शनिवार दि,११ रोजी दुपारी २ वाजता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लागला अशी माहिती अजित जठार यांनी दिली. बिबट्या पिंजऱ्यात कधी जेरबंद होतो याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले होते आणि आज अखेर आज पहाटे बिबट्या जेरबंद झाला त्याबद्धल जठार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, दिंडोशीचे स्थानिक आमदार सुनील प्रभू तसेच लोकमत आणि वनखात्याच्या सर्व टीमचे सोसायटीच्या वतीने जाहिर आभार मानले.
येथील बिबट्याचा मुक्त संचारा बाबत अधिक माहिती देतांना दीपक दिवटे आणि अजित जठार यांनी सांगितले की, नॅशनल पार्कच्या जंगलात असलेल्या मागील बाजूने बिबट्या वारंवार आमच्या सोसायटीत घुसल्याने रहिवासी भयभीत झाले होते आणि त्यांचा जीव धोक्यात आला होता. गेल्या ८ ते १० वर्षात अधूनमधून ३ ते ४ वेळा बिबट्या येथे येत होता. मात्र आता गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून सोसायटीच्या आवारात बिबट्या येण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. गेल्या काही दिवसांत रो-हाऊसच्या गच्चीवर ३ ते ४ वेळा बिबट्याचा शिरकाव झाला आहे. बिबट्याची शेवटची एंट्री दि, ७ मार्च रोजी मध्यरात्री १२.३७ मिनिटांनी येथील बंगलो क्रमांक ४५ डी, ४५ सी, ४५ बी, ४५ ए आणि ४४ डी च्या टेरेसवर मध्यरात्री उड्या मारत १२.२७ ते १.२८ पर्यंत सुमारे एका तासापेक्षा जास्त तो टेरेसवर होता.तर दि,८ मार्च रोजी मध्यरात्री २.२८ मिनिटांनी त्यांची हालचाल सोसायटीच्या सीसी टिव्ही कॅमेरात कैद झाली असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.
अखेर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा
न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत रॉयल हिल सोसायटीच्या गच्चीवर सलग दोन दिवस मध्यरात्री या गच्ची वरून त्या गच्चीवर उड्या मारणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आज दुपारी दोन वाजता पिंजरा लावण्यात आला.
या संदर्भात दि १० च्या लोकमत ऑनलाईन मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. काल सकाळी लोकमत ऑनलाईनमध्ये सदर वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध झाल्यावर विधानसभेत लोकमत ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला दिला. कात्रण दाखवत येथील सोसायटीत सलग दोन दिवस बिबट्याचा मुक्त संचारामुळे येथील ५०० नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सरकारने त्यांच्या सुरक्षितेसाठी त्वरित ठोस उपाययोजना करण्याची आग्रही मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली होती. तसेच त्यांनी या संदर्भात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देऊन त्यांची भेट घेतली होती.
याबाबत अजित जठार यांनी सांगितले की, लोकमतने ऑनलाईनला दिलेली बिबट्याची बातमी सर्वत्र जोरदार व्हायरल झाली आणि लगेच आमदार सुनील प्रभू यांनी सदर प्रश्नी विधानसभेत उठवलेल्या आवाजामुळे सरकारी यंत्रणा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लगेच कामाला लागली. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार वनखात्याने येथील रहेजा प्लॉट, म्हाडा बंगलो ४६ -अ च्या मागील बाजूस बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याचे वनक्षेत्रपाल विजय बारब्दे,वनपाल रोहन शिंदे, वनरक्षक सुरेंद्र पाटील, वैभव पाटील आणि अन्य बचाव पथकाने चांगले सहकार्य करत आपल्या समोर दि,११ रोजी पिंजरा लावला. आणि आज पहाटे बिबट्या अखेर जेरबंद झाला,आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला अशी माहिती शेवटी अजित जठार यांनी दिली.